बेशिस्त पार्किंगचा शहरवासीयांना ताप
By admin | Published: June 26, 2017 01:42 AM2017-06-26T01:42:53+5:302017-06-26T01:42:53+5:30
शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या दृष्टीने महापालिकेने कंबर कसली आहे. शहराच्या सौंदर्याला बाधा निर्माण करणाऱ्या अनियमित प्रकारांना आळा घालण्यासाठी
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या दृष्टीने महापालिकेने कंबर कसली आहे. शहराच्या सौंदर्याला बाधा निर्माण करणाऱ्या अनियमित प्रकारांना आळा घालण्यासाठी महापालिकेने मध्यंतरी सकारात्मक पावले उचलली होती. याअंतर्गत रस्त्यावर दुतर्फा होणाऱ्या बेशिस्त पार्किंगला शिस्त लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी वाहतूक विभागाशीही चर्चा करण्यात आली होती; परंतु ही चर्चा केवळ कागदापुरतीच मर्यादित राहिल्याने बेशिस्त पार्किंगचा शहरवासीयांना ताप जाणवू लागला आहे.
महापालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी रस्त्यांच्या कडेला दोन्ही बाजूने वाहने उभी केली जातात. त्यामुळे रहदारीला अडथळा होत नियमित वाहतूककोंडी होत आहे. विशेषत: वसाहतीअंतर्गत्च्या अरुंद रस्त्यांवर ही समस्या गंभीर बनली आहे. यासंदर्भात रहिवाशांच्या सातत्याने तक्रारी येत आहेत. रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी केल्याने दैनंदिन साफ-सफाईच्या कामात अडथळा येत आहे. त्यामुळे स्वच्छ शहर या संकल्पनेला खीळ बसताना दिसत आहे. रस्त्यांच्या दोन्ही बाजूला वाहने उभी केल्याने तातडीच्या प्रसंगी रुग्णवाहिका व अग्निशमन दलाच्या वाहनांना मार्ग काढताना कसरत करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार वसाहतीअंतर्गतच्या रहदारीच्या रस्त्यांवर सम-विषम, वनसाइड पार्किंग, वन वे-टू वे वाहतूक, तसेच नो पार्किंग क्षेत्र आदींचे नियोजन करण्यात आले होते.
अनेक भागांत त्याची कार्यवाहीसुद्धा सुरू करण्यात आली होती. ठिकठिकाणी नो पार्किंगचे सूचना फलकही लावण्यात आले होते. तसेच वाहनधारक आणि नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे जाहीर आवाहन करण्यात आले होते; परंतु त्यांची बदली होताच सुरू करण्यात आलेली ही योजनाही अडगळीत पडल्याचे दिसून आले आहे. अनेक इमारतींमध्ये पार्किंगसाठी स्टील्टच्या जागा आहेत; परंतु या जागेवर अनधिकृत बांधकाम करून त्याचा वाणिज्य व व्यावसायिक वापर केला जात आहे. स्टील्टच्या जागेवर अतिक्रमण झाल्याने इमारतीतील रहिवाशांना आपली वाहने रस्त्यावर उभी करावी लागत आहेत. त्यामुळे इमारतीच्या समोरील रस्त्यांवर नेहमीच वाहतूककोंडी होताना दिसत आहे. याची गंभीर दखल घेत, इमारतीतील स्टील्टच्या जागा पार्किंगसाठी खुल्या करण्याचे आवाहन महापालिकेने सोसायटीधारकांना केले होते; परंतु शहरवासीयांनी त्यालाही केराची टोपली दाखविल्याचे दिसून आले आहे. याचा परिणाम म्हणून सर्रासपणे सोसायटीच्या समोरील रस्त्यावर दुतर्फा वाहने उभी केली जातात.
शहराच्या अनेक भागांत मोठ्या प्रमाणात अनधिकृत गॅरेजेस सुरू आहेत. त्यामुळे वाहतूककोंडी होत आहे. शिवाय, पंक्चरचे पाणी, प्लास्टिक रॅपरचा कचरा तसाच टाकला जात असल्याने परिसरात अस्वच्छता पसरत आहे. ही बाब स्वच्छ व सुंदर शहराच्या संकल्पनेला मारक ठरत असल्याने या बेकायदा गॅरेजेसवर कारवाई करण्याचे संकेत दिले होते. तशी योजनाही आखण्यात आली होती; परंतु या योजनेलाही खीळ बसल्याने ही बेकायदा गॅरेजेस सुसाट झाली आहेत. विशेषत: वाशी विभागात सेक्टर १७ व पामबीच मार्गावर अशाप्रकारे बेकायदा गॅरेजेस सुरू आहेत. त्यामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे.