बस थांब्यांवर बेकायदा जाहिरातबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 03:35 AM2018-04-30T03:35:57+5:302018-04-30T03:35:57+5:30

राजकीय नेत्यांनी एनएमएमटीच्या बस थांब्यांवर बेकायदा जाहिरातबाजीचा सपाटा लावला आहे. यात महापालिकेतील सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी आघाडीवर आहेत.

Unauthorized advertising on bus stops | बस थांब्यांवर बेकायदा जाहिरातबाजी

बस थांब्यांवर बेकायदा जाहिरातबाजी

Next

नवी मुंबई : राजकीय नेत्यांनी एनएमएमटीच्या बस थांब्यांवर बेकायदा जाहिरातबाजीचा सपाटा लावला आहे. यात महापालिकेतील सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी आघाडीवर आहेत. विशेष म्हणजे, राजकीय दहशतीमुळे या विनापरवाना जाहिरात फलकांवर कारवाई करण्याचे संबंधित विभागाकडून धाडस होत नाही. त्यामुळे अतिक्रमण आणि बेकायदा होर्डिंग्जवर कारवाई करण्याच्या आयुक्तांच्या आदेशाला अप्रत्यक्षपणे हरताळ फासला जात आहे.
शहरात एनएमएमटीचे जवळपास ६०० बस थांबे आहेत. त्यावरील जाहिरातींचे अधिकार खासगी एजन्सीला देण्यात आले आहेत. त्याबदल्यात एनएमएमटी व्यवस्थापनाला वर्षाला ठरावीक महसूल प्राप्त होतो. विशेष म्हणजे, ६००पैकी जवळपास १०० बस थांब्यांवर विनापरवाना राजकीय जाहिरातबाजी केली जात असल्याचे दिसून आले आहे. यात नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या वाढदिवसाचे सर्वाधिक फलक असतात. मुळात बस थांब्यावरील राजकीय जाहिरातबाजीच्या परवानगीवरून एनएमएमटी आणि विभाग कार्यालय यांच्यात संभ्रम निर्माण झाला आहे. एनएमएमटीने हे थांबे खासगी एजन्सीला भाडेतत्त्वावर दिल्याने नव्याने परवानगी देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे एनएमएमटीचे म्हणणे आहे. तर बस थांब्यावरील बेकायदा जाहिरातबाजीवर कारवाई करण्याचे अधिकार आमच्या कार्यकक्षेत नसल्याचे विभाग कार्यालयाचे म्हणणे आहे. दोन विभागांतील विसंवादामुळे बस थांब्यांवर विनापरवाना जाहिरातबाजी करणाºया राजकीय पक्षांचे चांगलेच फावल्याचे दिसून आले आहे.
विधानसभेच्या ऐरोली मतदार संघात अशा बेकायदा जाहिरातबाजीचे फॅड वाढले आहे. यात कोपरखैरणे आणि ऐरोली विभाग आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे. कोपरखैरणे विभागात सध्या राष्ट्रवादी पुरस्कृत जीवनधाराच्या रोजगार मेळाव्याची जोरदार फलकबाजी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी करण्यात येत आहे. वाशी-कोपरखैरणे मार्गावरील बहुतांशी बस थांब्यांवर या मेळाव्याचे जाहिरात फलक लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, त्यावर परवानगीचे कोणतेही स्टीकर दिसत नाहीत.

करारातील अटी शर्तीचे उल्लंघन
१खासगी एजन्सीने बस थांबे भाडेतत्त्वावर घेतले आहेत, त्यामुळे त्यावर जाहिरात करण्याचे अधिकारी संबंधित एजन्सीचे आहेत, असे असले तरी त्यावर कोणत्या प्रकाराची जाहिरातबाजी करावी, याबाबतचे निकष ठरलेले आहेत. भाडेकरार करताना या नियमांचा स्पष्ट उल्लेख एनएमएमटीकडून करण्यात आलेला आहे, असे असतानाही संबंधित एजन्सीकडून या नियमांचे उल्लंघन होत आहे.
दहशतीला आळा घालण्याची गरज
२शहरातील १००पेक्षा अधिक बस थांब्यांवर राजकीय नेते व पदाधिकाºयांकडून बेकायदा जाहिरातबाजी केली जात आहे. हे फलक काढायला गेलेल्या एजन्सीच्या कर्मचाºयांना दमदाटी केली जाते. राजकीय दहशतीमुळे संबंधित एजन्सीही याबाबत मौन बाळगून असल्याचे दिसून आले आहे. जाहिरात फलक लावण्याच्या वादातून राष्ट्रवादीच्या दोन पदाधिकाºयांचा नगरमध्ये निर्घृण खून करण्यात आला. गेल्या आठवड्यात घडलेल्या या घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने शहरातील विनापरवाना राजकीय जाहिरातबाजीला आळा घालण्याची गरज निर्माण झाली आहे.

Web Title: Unauthorized advertising on bus stops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.