नवी मुंबई : प्रशासनाच्या उदासीनतेमुळे जुहूगाव येथील पाडलेली अनधिकृत इमारत पुन्हा बांधण्यात आली असून, त्याचा व्यावसायिक वापर होत असल्याचे दिसून येत आहे. त्या ठिकाणी यापूर्वी दोन ते तीन वेळा अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई केलेली आहे. यानंतरही इमारत उभारली जात असताना त्याकडे होत असलेल्या दुर्लक्षामागे ‘अर्थ’कारण असल्याचा आरोप होत आहे.शहरातील अनधिकृत बांधकामांच्या विरोधात पालिका व सिडको यांच्याकडून संयुक्त मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेत शहरातील अनधिकृत बांधकामे पाडली जात आहेत. मात्र, पाडलेल्या बांधकामांच्या ठिकाणी पुन्हा बांधकामे होत असताना त्याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे कारवायांमागे अर्थकारण असल्याचा आरोप होत आहे. अशातच जुहूगाव सेक्टर ११ येथील काही महिन्यांपूर्वी पाडलेली इमारत पुन्हा उभारली जात असल्याचे दिसून येत आहे. तर इमारतीचे बांधकाम सुरू असतानाच तिथले गाळे भाड्याने देऊन त्यांचा व्यावसायिक वापर सुरू आहे. धान्य विक्री केंद्र, पानाच्या टपऱ्या याशिवाय इतर प्रकारची दुकाने त्या ठिकाणी चालवली जात आहेत. इमारतीच्या वरच्या मजल्याचे बांधकाम सुरू असताना तळमजल्याचा होणारा वापर अनेकांच्या जीवावरही बेतू शकतो. यानंतरही दोन्ही प्रशासनाकडून त्या अनधिकृत बांधकामाकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.जुहूगाव येथील खाडीलगच्या बाजूच्या सीआयएसएफ वसाहती समोरील मार्गावर हे बांधकाम सुरू आहे. मुख्य रस्त्यालगतच ही अनधिकृत इमारत असल्याने त्या ठिकाणी आजवर झालेल्या कारवाया व त्यानंतर पुन्हा झालेले बांधकाम परिसरातील रहिवाशांच्या नजरेस पडत आहे; परंतु त्याच रस्त्याने सतत ये-जा करणाºया पालिका अधिकाºयांच्या ते नजरेस पडत नसल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.
कारवाईनंतरही अनधिकृत इमारत उभी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 4:26 AM