अनधिकृत चाळीवर पाणीपुरवठा विभाग मेहरबान
By admin | Published: September 14, 2016 04:48 AM2016-09-14T04:48:03+5:302016-09-14T04:48:03+5:30
इंदिरानगरमधील अनधिकृतपणे बांधलेल्या चाळीमध्ये मोटारचा वापर केला जात आहे. अनधिकृतपणे साठवण टाकीही बसविली असून सर्वसामान्य नागरिकांवर कारवाई करणारे
नवी मुंबई : इंदिरानगरमधील अनधिकृतपणे बांधलेल्या चाळीमध्ये मोटारचा वापर केला जात आहे. अनधिकृतपणे साठवण टाकीही बसविली असून सर्वसामान्य नागरिकांवर कारवाई करणारे प्रशासन संबंधीतांवर काहीच कारवाई करत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील अनधिकृत नळजोडण्या तोडण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर पालिका प्रशासनाने तीन हजारपेक्षा जास्त नळजोडण्या खंडीत केल्या आहेत. कोपरखैरणे, वाशी, ऐरोली, नेरूळ परिसरामध्ये नागरिकांनी बसविलेल्या मोटार जप्त केल्या आहेत. परंतु इंदिरानगरमध्ये मनपा शाळेच्या बाजूला अनधिकृतपणे चाळ उभारण्यात आली आहे. एक मजली इमारत उभी केली असून त्या खोल्या भाड्याने दिल्या आहेत. येथे वैयक्तीक नळजोडणी केली असून पाणी साठविण्यासाठी स्वतंत्र टाकी बसविण्यात आली आहे.
इंदिरानगरमध्ये या चाळीमालकाचा भंगारचा व्यवसाय आहे. भंगारच्या गोदामावरही साठवण टाकी बसविण्यात आली आहे. मुळात गोडावूनचा एक मजलाही पालिकेची परवानगी न घेता वाढविण्यात आला आहे. येथेही मोटारचा वापर केला जात आहे. महापालिका प्रशासन या नळजोडण्यांवर का कारवाई करत नाही असा प्रश्न परिसरतील रहिवाशी विचारू लागले आहेत.
(प्रतिनिधी)