उरण परिसरात वाढताहेत अनधिकृत कंटेनर यार्ड; सिडको, महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 11:46 PM2020-01-14T23:46:48+5:302020-01-14T23:47:13+5:30

बंदरामुळे आयात-निर्यातीच्या व्यवसायात वाढ

Unauthorized container yards growing in the desert area; CIDCO, neglect of revenue administration | उरण परिसरात वाढताहेत अनधिकृत कंटेनर यार्ड; सिडको, महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष

उरण परिसरात वाढताहेत अनधिकृत कंटेनर यार्ड; सिडको, महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष

Next

मधुकर ठाकूर 

उरण : येथील आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध बंदरामुळे कंटेनर आयात-निर्यातीच्या व्यवसायात प्रचंड वाढ होत आहे. कंटेनर हाताळणीचा व्यवसाय प्रचंड नफ्यात चालणारा असल्याने परिसरात कंटेनर साठवणुकीसाठी अनेक गोदामे, कंपन्यांची मोठ्या प्रमाणात उभारणी होऊ लागली आहे. मात्र, शेकडो गोदामे, कंपन्या सिडको व महसूल खात्याच्या पूर्व परवानगीशिवाय अनधिकृतरीत्या उभारण्यात आली असल्याचे उघडकीस येऊ लागले आहे. सिडको, महसूल आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे किंवा संगनमतानेच ही अनधिकृत गोदामे उभी राहत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

उरण परिसरात जेएनपीटी बंदराची निर्मिती झाल्यापासून विकासाला गती आली आहे. विकासकामांच्या व प्रगतीच्या जोरावर जेएनपीटी देशातील नंबर वन बंदर बनले आहे. या बंदराने खासगीकरणातून बांधा, वापरा आणि हस्तांतर करा (बीओटी) या तत्त्वावर आणखी चार बंदरे उभारली आहेत. या चारही बंदरातून सध्या तरी वर्षाकाठी ५१ लाखांपेक्षा अधिक कंटेनर मालाची जगभरात आयात-निर्यात केली जाते. सागरीमार्गे कंटेनरमधून मालाची वाहतूक करण्याची मागणी सातत्याने वाढतच आहे. त्यामुळे कंटेनर हाताळणीचा व्यवसाय प्रचंड नफ्यात चालत असल्याने जेएनपीटीने सध्या अस्तित्वात असलेल्या तिन्ही बंदरांपेक्षा कंटेनर हाताळणीच्या चौपट क्षमतेचे म्हणजे ५० लाख कंटेनर हाताळणी करणाºया भारत मुंबई कंटेनर टर्मिनल बंदराची उभारणी केली आहे. यामुळे प्रकल्प पूर्णत्वास आल्यानंतर जेएनपीटीसह इतर चारही बंदरातून येत्या दोन वर्षांत एक कोटी कंटेनर्स इतकी प्रचंड आयात-निर्यात होणार आहे.

उरण परिसरात कंटेनर हाताळणीचा व्यवसाय प्रचंड तेजीत असल्याने सीएफएस, सीडब्ल्यूसी व इतर कंटेनर हाताळणी करणाºया विविध कंपन्यांची सुमारे १५० ते २०० गोदामे परिसरात उभारण्यात आली आहेत. त्यापैकी सिडकोच्या हद्दीतच जासई, चिर्ले, पागोटे, धुतुम, पौंडखार, बेलोंडेखार येथे मागील काही वर्षांपासून १९ अनधिकृत कंटेनर यार्ड उभारण्यात आले आहेत.

उरण तालुक्यात सिडकोच्या हद्दीत असलेले १९ कंटेनर यार्ड अनधिकृत असल्याचे, सिडको अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने याआधीच स्पष्ट केले आहे. यामध्ये आणखी काही अनधिकृत कंटेनर यार्डची भर पडली आहे. मात्र, वाढलेल्या कंटेनर यार्डची माहिती सिडकोच्या अधिकाऱ्यांकडेही उपलब्ध नाही. मात्र, चार-पाच वर्षांपूर्वी असलेल्या या अनधिकृत कंटेनर यार्डला सिडकोने नोटिसाही धाडल्या होत्या. मात्र, त्यानंतर झालेल्या दुर्लक्षामुळे महसूल विभागाच्या हद्दीतच अनधिकृत कंटेनर यार्डच्या संख्येत आणखी शेकडोंनी भर पडल्याची कबुली उरण तहसीलदार कार्यालयातून देण्यात आली आहे.

अधिकाºयांचे एकमेकांकडे बोट
उरण तालुक्यातील सिडको हद्दीत असलेल्या अनधिकृत कंटेनर यार्डांना नोटिसा बजावल्या जात असल्या तरी अनधिकृत कंटेनर यार्डचे बांधकाम पाडण्यासाठी पोलीस संरक्षण व बंदोबस्ताची आवश्यकता असते. मात्र, मागणीनुसार पोलीस संरक्षण मिळत नसल्याची सिडको अधिकाºयांची तक्रार आहे.

पोलिसांच्या असहकार्यामुळे अनधिकृत कंटेनर यार्डवर कारवाई करण्यात दिरंगाई होत असल्याचे सिडको अधिकाºयाकडून सांगितले जात आहे. कारवाईसाठी स्वत:ची कायमस्वरूपी पोलीस यंत्रणा कार्यरत असावी, त्या दृष्टीने सिडकोने प्रयत्न सुरू केले आहेत.
संचालक मंडळाने तसा ठरावही मंजूर करून शासनाकडे पाठविला आहे. तसेच या विभागासाठी कायमस्वरूपी बंदोबस्त व अतिरिक्त जिल्हाधिकारीपदाच्या नियुक्तीची मागणीही सिडकोने शासनाकडे केली आहे.

त्याची पूर्तता अद्याप तरी शासनाकडून करण्यात आली नसल्याची माहिती सिडकोच्या अधिकाºयांकडून सांगण्यात येत आहे. याबाबत संबंधित विभागाकडून माहिती घेऊन चौकशी करून कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांनी दिली.

महसूल विभागाकडून उरण परिसरातील महसूल हद्दीतील सुमारे १२० अनधिकृत बांधकामे केलेल्या कंटेनर यार्डना कारवाईच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. - भाऊसाहेब अंधारे, तहसीलदार, उरण

पोलीस ठाण्यातच कर्मचाºयांची कमतरता आहे, असे असताना सिडकोला पोलीस संरक्षण आणि पोलीस बंदोबस्त देणार कुठून. मात्र, कायदा, सुव्यस्थेची काळजी घेऊन आवश्यकता आणि मागणीनुसार पोलीस बल बंदोबस्तासाठी नेहमीच उपलब्ध करून देण्यात येते.
- विठ्ठल दामगुडे, सहायक पोलीस आयुक्त, न्हावा-शेवा बंदर

शासनाचे नियम पायदळी
उरण परिसरातील या अनधिकृत कंटेनर यार्डचा मात्र वाहतुकीवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होऊ लागला आहे. काही ठिकाणी असलेल्या अनधिकृत कंटेनर यार्डमध्ये तसेच जेएनपीटी बंदरात वाहतूक करणारे कंटेनर ट्रेलर्सना या मार्गावर वाहतुकीस बंदी आहे.
या बंदी आदेशाला भीक न घालता अशा मार्गावरून कंटेनरची वाहतूक मोठ्या प्रमाणात केली जाते. परिणामी, वेगाने धावणाºया या अवजड वाहनांमुळे होणाºया अपघातात दिवसेंदिवस प्रचंड वाढ होत चालली आहे. अनधिकृत कंटेनर यार्डच्या उभारणीत शासनाचे आणि सुरक्षेसाठी असलेल्या सर्वच नियम पायदळी तुडविले जात आहेत. परिणामी, उरण परिसरात कंटेनर यार्डमधील अपघात, आग आदी दुर्घटनेच्या प्रकारात मोठी वाढ झाली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

Web Title: Unauthorized container yards growing in the desert area; CIDCO, neglect of revenue administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.