मयूर तांबडे पनवेल : स्वच्छता सर्वेक्षण २०१८च्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिका विविध उपक्र म राबवत आहे. एकीकडे स्वच्छता अभियानांतर्गत पनवेल परिसरात स्वच्छता राखण्याचे आवाहन केले जात आहे. तर दुसरीकडे पनवेल महापालिकेकडूनच परिसरात अनधिकृतरीत्या फलकबाजी केली जात आहे, यामुळे शहर विद्रूप होत आहे.पनवेल नगरपालिका असताना पनवेल शहर व परिसर बॅनरबाजीमुळे विद्रूप करण्यात येत होते. वाढदिवस, लग्न, साखरपुडा, नियुक्ती आदींचे फलक संपूर्ण पनवेल परिसरात लावून शहराला बकाल केले जात असे. त्यामुळे जागोजागी शुभेच्छांचे फलक निदर्शनास येत असत. मात्र, महापालिकेची घोषणा झाल्यानंतर अनधिकृत बॅनरबाजी विरोधात आयुक्तांनी धडाका लावला होता. अनेकांकडून दंड आकारण्यात आला होता. त्यातून लाखो रु पयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यामुळे परिसरात अनधिकृतरीत्या उभारण्यात येत असलेल्या बॅनरबाजीवर वचक बसला होता. स्वच्छता अभियानात पनवेल महापालिकेनेही सहभाग घेतला आहे.परिसरात स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जात आहे. यासाठी पालिकेकडून फलकबाजी केली जात आहे. पालिकेने पनवेलमध्ये अधिकृत फलकबाजी करण्यासाठी भाडे तत्त्वावर स्टँड उभारले आहेत. मात्र, पालिकेकडून बेकायदा फलकबाजी केली जात आहे. त्यामुळे बेकायदा बॅनरबाजीमुळे पनवेल पालिकाही राजकीय नेत्यांच्या पावलावर पावले टाकू लागल्याची टीका पनवेलकरांकडून करण्यात येत आहे.>पनवेल महापालिका सार्वजनिक हितासाठी फलक प्रसिद्ध करत असेल, तर त्याला अनधिकृत म्हणता येणार नाही. महापालिका सार्वजनिक हितासाठी काम करते. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी सार्वजनिक हिताच्या गोष्टी प्रसिद्ध करू शकते.- जमीर लेंगरेकर, पालिका उपायुक्त, पनवेल महापालिका> पालिकेने स्वच्छतेबाबत प्रबोधन करणारे लहान-मोठे बॅनर्स परिसरात झळकविले आहेत. आयुक्तांनी पनवेल बॅनरमुक्त करण्याचे आदेश दिले असताना, पालिकेनेच प्रबोधनाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर बॅनर झळकविल्याने पनवेल परिसर विद्रूप होऊ लागले आहेत. महापालिका हद्दीतील आदई सर्कल, पंचरत्न हॉटेल, एचडीएफसी सर्कल जवळ, पनवेल रेल्वे स्टेशन, तसेच २९ गावांतील काही ठिकाणी स्वच्छता सर्वेक्षण, तसेच कार्यशाळेची अनधिकृत फलकबाजी पनवेल महानगरपालिकेकडून करण्यात आली आहे. तर नुकत्याच तालुका क्रीडा संकुलाचे उद्घाटन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आले होते, त्याचेदेखील अनधिकृत फलक काही ठिकाणी भाजपाकडून उभारण्यात आलेले आहेत. या बॅनरबाजीमुळे पनवेल पालिकाही आता राजकीय नेत्यांच्या पावलावर पावले टाकू लागल्याची टीका पनवेलकरांकडून करण्यात येत आहे.
पनवेल महापालिकेकडून क्षेत्रात अनधिकृत फलकबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 2:39 AM