अनधिकृत गॅरेज, पार्किंग, झोपड्यांवर हातोडा, कळंबोलीत सिडकोची धडक मोहीम
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 09:13 AM2021-03-17T09:13:29+5:302021-03-17T09:14:57+5:30
कोरोनाच्या काळात सिडको वसाहतीत मोठ्या प्रमाणात अतिक्रमणात वाढ झाली आहे. दोन दिवसांपूर्वी करंजाडे परिसरात कारवाई झाली. त्यानंतर, मंगळवारी कळंबोली येथे सकाळी १० वाजल्यापासून कारवाईला सुरुवात करत, अनधिकृत अतिक्रमणावर सिडकोने हातोडा मारला.
कळंबोली: कळंबोली वसाहत येथे मंगळवारी सकाळी सिडकोने धडक मोहीम हाती घेतली. येथील सिडकोच्या जागेवर अतिक्रमण केलेले गॅरेज, अवजड वाहतूक पार्किंग, ढाबे, झोपडपट्टीवर सिडकोने हातोडा मारत अतिक्रमण हटविले.
कोरोनाच्या काळात सिडको वसाहतीत मोठ्या प्रमाणात अतिक्रमणात वाढ झाली आहे. दोन दिवसांपूर्वी करंजाडे परिसरात कारवाई झाली. त्यानंतर, मंगळवारी कळंबोली येथे सकाळी १० वाजल्यापासून कारवाईला सुरुवात करत, अनधिकृत अतिक्रमणावर सिडकोने हातोडा मारला. पनवेल- मुंब्रा महामार्गालगत मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांचे पार्किंग, गॅरेज, हॉटेल, ढाबे सुरू होते. यात भंगार गोदामाचा समावेश आहे. या दुकानात अनेकदा आगी लागल्या आहेत. सेक्टर १० ई, ९ ई, १८ येथील प्लॉटवर अतिक्रमण करण्यात आलेले पक्के बांधकाम, झोपड्या, ढाबे, गॅरेज, पार्किंग, भंगारवाले स्टॉल तोडण्यात आले. यासाठी २ जेसीबी, १ ट्रक, १० लेबर, त्याचबरोबर पोलीस अधिकाऱ्यांसह ३० पोलिसांचा बंदोबस्त होता. सिडकोचे मुख्य नियंत्रक अनिल पवार, नियंत्रक विशाल ढगे, सहायक नियंत्रक अमोल देशमुख, भूमापक धोंडिबा नामवाड यांच्या मार्गदर्शनाखाली साडेचार वाजेपर्यंत कारवाई सुरू होती.
मार्बल मार्केट येथे केली कारवाई
सिडकोकडून सेक्टर २३ येथील मार्बल मार्कट येथील ढाबा, तसेच मार्बल मंदीर विक्रीसाठी सिडको जागेवर अतिक्रमण करण्यात आले होते. त्यावर मंगळवारी सिडको अतिक्रमण पथकाने कारवाई करत अतिक्रमण हटविण्यात आले आहे.