घणसोलीत अनधिकृत फेरीवाल्यांना मिळतेय अभय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 01:44 AM2017-11-09T01:44:25+5:302017-11-09T01:44:36+5:30
पालिकेकडे हस्तांतरित झालेल्या घणसोली विभागात अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. अनधिकृत फेरीवाल्यांनी परिसरातील रस्ते, नाल्यालगतची मोकळी जागा व्यापली आहे.
नवी मुंबई : पालिकेकडे हस्तांतरित झालेल्या घणसोली विभागात अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. अनधिकृत फेरीवाल्यांनी परिसरातील रस्ते, नाल्यालगतची मोकळी जागा व्यापली आहे. अशातच मोकळ्या मैदानावर आठवडी बाजारही भरू लागले असून, त्याठिकाणी शहराबाहेरील फेरीवाले बसू लागले आहेत.
फेरीवाल्यांचे अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामे यामुळे शहराच्या प्रतिमेला गालबोट लागत आहे. नेरुळ, वाशीपाठोपाठ घणसोली परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांचे मोठ्या प्रमाणात साम्राज्य निर्माण होत चालले आहे. वेळीच त्यांच्यावर कारवाई न झाल्यास भविष्यात या अनधिकृत फेरीवाल्यांना पोसण्याची जबाबदारी प्रशासनाला घ्यावी लागेल अशी टीकाही होत आहे. घणसोली रेल्वेस्थानकासमोरील मार्ग, सिम्प्लेक्स वसाहतीलगतचे रस्ते व मोकळे मैदान याठिकाणी अनधिकृत फेरीवाल्यांनी आपले बस्तान मांडले आहे. यासंदर्भात अनेकांनी पालिकेकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र कारवाईच्या काही मिनिटे अगोदर फेरीवाले त्याठिकाणावरुन उठून गेलेले असतात. यामुळे पालिकेच्या अतिक्रमण विरोधी कारवाईत पारदर्शकता नसल्याचा आरोप मनसे शहर सचिव संदीप गलुगडे यांनी केला आहे. काही महिन्यांपूर्वी सिडको व पालिकेने सिम्प्लेक्सलगतच्या मैदानावरील धार्मिक स्थळावर रात्रीच्या वेळी कारवाई केली होती. या कारवाईनंतर त्याच मैदानावर व पदपथावर दर बुधवारी आठवडी बाजार भरत आहे. मुंबईच्या विविध भागासह पनवेल व इतर परिसरातील फेरीवाले त्याठिकाणी व्यवसायासाठी येत आहेत. त्यांच्यावर मात्र कारवाईत होत नसल्याने आठवडी बाजाराला नेमका कोणाचा आशीर्वाद ? असा प्रश्न गलुगडे यांनी उपस्थित केला आहे. अशा व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे.
घणसोली रेल्वेस्थानकासमोरील रहदारीच्या मुख्य मार्गावर संध्याकाळी मोठ्या प्रमाणात अनधिकृत फेरीवाले बसलेले असतात. त्यापैकी वडापाव अथवा इतर खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून उघड्यावर गॅस सिलिंडरचा वापर होत आहे. त्यामुळे भविष्यात त्याठिकाणी सिलिंडरचा स्फोट होवून दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही. या फेरीवाल्यांना अर्थपूर्ण पाठबळ लाभत असल्याचा आरोप भाजपा महामंत्री कृष्णा पाटील यांनी केला आहे. त्यामुळेच सदरचा मार्ग कायमस्वरुपी फेरीवालामुक्त केला जात नसल्याचाही त्यांचा आरोप आहे. तर प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे अनधिकृत टपºयांच्या बाहेरची जागा देखील भाड्याने दिली जात आहे. अशा ठिकाणांवर देखील कारवाईला होत नसल्याने घणसोली नोड अनधिकृत फेरीवाल्यांच्या विळख्यात सापडला आहे.