मेळाव्यासाठी अनधिकृत होर्डिंगबाजी
By admin | Published: September 26, 2016 02:27 AM2016-09-26T02:27:31+5:302016-09-26T02:27:31+5:30
माथाडी मेळाव्याला उपस्थित राहणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी शहरात सर्वत्र होर्डिंग लावण्यात आले होते. महापालिकेची परवानगी न घेताच
नवी मुंबई : माथाडी मेळाव्याला उपस्थित राहणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी शहरात सर्वत्र होर्डिंग लावण्यात आले होते. महापालिकेची परवानगी न घेताच अनेक होर्र्डिंग लावून शहर विद्रूप केल्याचे चित्र दिसू लागल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून आयुक्त तुकाराम मुंढे याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कामगार मेळाव्यासाठी एपीएमसीच्या बाहेर माथाडी कामगार व भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात होर्डिंग लावले होते. सानपाडा रेल्वे स्टेशन ते एपीएमसी मार्केट व अन्नपूर्णा चौक ते अरेंजा सर्कल दरम्यान विद्युत खांबावरही मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचे होर्डिंग लावले होते. यामधील काही अपवाद वगळते तर इतर होर्डिंगसाठी परवानगीच घेण्यात आली नव्हती.
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरात अनधिकृत होर्डिंग लावणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. नेरूळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक रवींद्र इथापे यांच्या कार्यकर्त्यांवरही गुन्हा दाखल झाला आहे. इतरही काही नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. यामुळे आता मुख्यमंत्र्यांच्या समर्थकांवर गुन्हे दाखल होणार का असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत. (प्रतिनिधी)
एपीएमसीमधील माथाडी मेळाव्यामध्ये राज्यभरात चांगले काम करणाऱ्या कामगारांना माथाडी भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कामगारांना प्रोत्साहन देण्यासाठी हा पुरस्कार देण्यात यतो. यावर्षी राज्यातील पंधरा कामगारांना माथाडी भूषण पुरस्कार देण्यात आला. यामध्ये मारूती विठोबा कंक, अहमद हुसेन कचोरी, बाबूराव वीरप्पा वेळे, भिकाजी श्रीपती लोखंडे, पिराजी रामू नेवसे, शंकर काळे, महादेव सूर्यवंशी, भरत आढाव, ओमप्रकाश चौधरी, लक्ष्मण कोंडीबा कदम, पुणे जिल्ह्यातील विवेक सुरेश ओंबासे,स्वप्निल सुनील येवले, नाशिकमधील बाजीराव हरी सोनावणे, संतोष नामदेव म्हस्के, अहमदनगरमधील नवनाथ किसन सलालकर यांचा समावेश आहे. कामगारांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.