कोपरखैरणे खाडी परिसरात अनधिकृत झोपड्यांचे पेव; महापालिकेसह वनविभागाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 11:49 PM2020-01-14T23:49:12+5:302020-01-14T23:49:35+5:30

कारवाईनंतरही परिस्थिती जैसे थे

Unauthorized huts in the Koparkheran Bay area; Forest department neglect with the municipality | कोपरखैरणे खाडी परिसरात अनधिकृत झोपड्यांचे पेव; महापालिकेसह वनविभागाचे दुर्लक्ष

कोपरखैरणे खाडी परिसरात अनधिकृत झोपड्यांचे पेव; महापालिकेसह वनविभागाचे दुर्लक्ष

googlenewsNext

नवी मुंबई : कोपरखैरणे गावालगतच्या खाडीकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात नागरी वसाहत निर्माण झाली आहे. या ठिकाणी बेकायदा झोपड्यांचे पेव फुटले आहे, त्यामुळे खाडीलगतच्या रस्त्यावरही मोठ्याप्रमाणात अतिक्रमण झाले आहे. परिणामी, येथून मार्गक्रमण करताना वाहनधारक विशेषत: स्कूल बस आणि रुग्णवाहिकेला अडथळ्याची शर्यत पार करावी लागत आहे.

नवी मुंबईत बेकायदा बांधकामांचा प्रश्न कळीचा मुद्दा बनला आहे. विविध राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांनी केवळ व्होट बँक म्हणून बेकायदा झोपड्या आणि बांधकामांना अप्रत्यक्षरीत्या पाठबळ दिल्याचे वारंवार स्पष्ट झाले आहे. याचा परिणाम म्हणून शहरातील प्रत्येक गावालगतच्या खाडीकिनाºयावर भराव टाकून नागरी वसाहती उभारण्यात आल्याचे चित्र पाहावयास मिळते. गोठीवली, घणसोलीसह कोपरखैरणे, वाशीगाव या गावांच्या खाडीकिनाºयांवर मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे उभारली गेली आहेत. विशेष म्हणजे, या बांधकामांना महापालिकेकडून रीतसर नळजोडण्या आणि महावितरणकडून विद्युतपुरवठाहीदेण्यात आला आहे. कोपरखैरणे गावाच्या खाडीकिनाºयावर सध्या बेकायदा झोपड्यांचे पेव फुटले आहे, तसेच अनेक ठिकाणी चाळी उभारल्या आहेत. ही बेकायदा घरे कष्टकरी तसेच मजुरांच्या कुटुंबांना भाडेतत्त्वावर देण्यात आली आहेत. यात परप्रांतीय नागरिकांचा सहभाग मोठा असल्याचे दिसून आले आहे. रिक्षाचालक, पानाचे ठेले चालविणारे फेरीवाले आदीचीही येथे मोठी वसाहत आहे. मागील काही महिन्यांत ही बेकायदा वसाहत खाडीत विस्तारीत होताना दिसत आहे. त्यामुळे शेजारच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रहदारी वाढली आहे. या झोपड्यातील लहान लहान मुले चक्क रस्त्यावर खेळत असल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. रस्त्याच्या एका बाजूला रिक्षा, छोटे टेम्पो आणि हातगाड्यांच्या रांगा लागल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे.

खाडीकिनारी क्षेत्र वनविभागाच्या अखात्यारित येते. त्यामुळे वनविभागाच्या माध्यमातून या भागात ठिकठिकाणी फलकही लावण्यात आले आहेत. त्यानंतरही बिनदिक्कतपणे येथे अतिक्रमणे उभी राहिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मध्यंतरीच्या काळात येथील बेकायदा झोपड्यावर महापालिका आणि वनविभागाने अनेकदा कारवाई केली. मात्र, त्यानंतर काही दिवसांतच या वसाहती पुन्हा उभ्या ठाकल्या. पुढील काही महिन्यांत नवी मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका आहेत. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी उभारलेल्या बेकायदा झोपड्यांना संरक्षण देण्याची भूमिका त्या त्या विभागातील स्थानिक पुढाºयांची असल्याचे दिसून येते.

मध्यंतरीच्या काळात कोपरखैरणे खाडीतील झोपड्यांना भीषण आग लागली होती. रस्त्यांवरील वाहनांचे अतिक्रमण दाटीवाटीने अगदी खाडीच्या आतील भागात उभ्या रहिलेल्या झोपड्या यामुळे अग्निशमन पथकाला आग विझविताना कसरत करावी लागली होती. या पार्श्वभूमीवर संभाव्य दुर्घटना टाळण्याच्या दृष्टीने महापालिका आणि वनविभागाने आतापासूनच कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे.

Web Title: Unauthorized huts in the Koparkheran Bay area; Forest department neglect with the municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.