महापे एमआयडीसीत अनधिकृत झोपड्यांचे पेव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 01:33 AM2019-12-23T01:33:19+5:302019-12-23T01:33:31+5:30
कारवाईकडे दुर्लक्ष : स्थानिक पुढाऱ्यांच्या अर्थपूर्ण पाठिंब्यामुळे भूमाफियांचा उच्छाद
अनंत पाटील
नवी मुंबई : महापे एमआयडीसी परिसरात बेकायदा झोपड्यांचे पेव फुटले आहेत. भूमाफियांनी मोकळ्या जागा बळकावून त्यावर झोपड्या उभारल्या आहेत. या झोपड्या गरिबांच्या माथी मारल्या जात आहेत. बेकायदा झोपड्यांबरोबरच या परिसरात म्हशींचे तबेलेही वाढले आहेत. तसेच या परिसरात होणाºया रसायनाच्या टँकरमुळे अपघातांची शक्यता वाढली आहे.
औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांतून महापालिका कोट्यवधी रुपयांचा कर वसूल करते. मात्र आवश्यक पायाभूत सुविधा देण्यात मात्र महापालिकेकडून आकडता हात घेतला जात असल्याच्या उद्योजकांच्या तक्रारी आहेत. याचा परिणाम म्हणून या परिसरातील रस्तेदुरुस्ती, गटर मीटरची कामे एमआयडीसीला करावी लागत आहेत. यातच या परिसरात बेकायदा बांधकामे आणि वाढत्या झोपड्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. स्थानिक पुढाऱ्यांच्या आशीर्वादाने भूमाफियांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे या परिसरातील दहा ते बारा एकर क्षेत्रफळाचा भूखंड गिळंकृत करण्यात आला आहे. व्होेट बँकेसाठी स्थानिक पुढाºयांकडून या बेकायदा झोपड्यांना अभय मिळत असल्याचा आरोप केला जात आहे.
महापे ए ब्लॉकमध्ये तर मोकळ्या भूखंडावर थेट म्हशींचे तबेले थाटले आहेत.
येथील काही रिकाम्य भूखंडावर अनधिकृत झोपड्या उभारल्या आहेत. या झोपडपट्टीत मोठ्या प्रमाणात बांगलादेशी नागरिक वास्तव्याला असल्याचे दिसून आले आहे. रसायनाने भरलेले ट्रक रस्त्याच्या दुतर्फा आणि मोकळ्या भूखंडावर उभे केले जातात. त्यामुळे अपघाताची भीती व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे येथील रस्त्यांवर नेहमीच वाहतुकीची कोंडी पाहावयास मिळते. बेकायदा झोपड्यांमुळे ही परिस्थिती ओढावल्याचे बोलले जात आहे. या झोपड्या गरीब व कष्टकºयांना भाडेतत्त्वावर दिल्या जात आहेत.
महापालिकेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी २000 सालानंतर उभारलेल्या झोपड्यांवर धडक कारवाई करीत एमआयडीसीतील अनेक भूखंड अतिक्रमणमुक्त केले होते. मात्र त्यांच्या बदलीनंतर महापालिकेची ही मोहीम थंडावल्याने भूमाफियांनी पुन्हा आपल्या कारवाया सुरू केल्या आहेत. याचा परिणाम म्हणून बेकायदा झोपड्या उभारण्यात आल्या आहेत.