पारसिक टेकडीच्या सौंदर्याला अनधिकृत झोपड्यांचा विळखा
By नामदेव मोरे | Published: June 22, 2023 11:33 AM2023-06-22T11:33:43+5:302023-06-22T11:33:56+5:30
रेल्वेबोगद्याजवळ अतिक्रमण : भूमाफियांवर कारवाईकडे दुर्लक्ष
नवी मुंबई : निसर्गाचे वरदान लाभलेल्या पारसिक टेकडी परिसराला झोपड्यांचा विळखा पडला आहे. रेल्वे बोगद्याच्या दोन्ही बाजूंकडून डोंगरउतारावर झोपड्यांचा विळखा घट्ट हाेत असून, २००पेक्षा जास्त बांधकामे झाली आहेत. पायथ्यापासून विश्वनाथ महाराज समाधी मंदिरापर्यंत अतिक्रमणे वाढत असून, कोट्यवधी रुपयांचे भूखंड भूमाफियांनी गिळंकृत केल्यानंतरही प्रशासनाने ठोस कारवाई करण्याऐवजी कानाडोळा केल्याने संताप व्यक्त होत आहे.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये अनधिकृत झोपड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एमआयडीसीमध्ये दिघा, अडवली भुतावलीपासून ते थेट नेरूळपर्यंत मोकळ्या भूखंडावर झपाट्याने झोपड्यांचे बांधकाम केले जात आहे. एमआयडीसीबरोबर आता सिडकोच्या जमिनीवरही झोपड्यांचे बांधकाम सुरू आहे. पावसाळ्यात पालिका व सिडकोचे अतिक्रमणविरोधी पथक कारवाई करत नसल्याचा गैरफायदा घेऊन जमीन हडप केली जात आहे.
रेल्वे रुळांवर झोपड्या कोसळल्या तर....
रेल्वेच्या पारसिक बोगद्याच्या दोन्ही बाजूला डोंगर उतारावर २००पेक्षा जास्त झोपड्यांचे बांधकाम केले आहे. नवीन झोपड्यांचे बांधकामही वेगाने सुरू आहे.
शहाबाज गावातील दफनभूमीला लागून असलेल्या भूखंडावर डोंगराच्या पायथ्यापर्यंत बांधकाम केले आहे.
यामुळे टेकडीवरील निसर्गाचा ऱ्हास होऊन परिसर बकाल होत आहे. शिवाय पावसाळ्यात रेल्वे रुळांवर झोपड्या कोसळल्या तर गंभीर अपघाताची भीती आहे.
मात्र, या अतिक्रमणाविरोधात सिडको व महानगरपालिकेचे अधिकारी ठोस कारवाई करत नसल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
कोट्यवधीचे भूखंड गिळंकृत
पारसिक परिसरातील भूखंडांची किमत कोट्यवधी रुपये आहे. अत्यंत मोक्याच्या जागेवर असलेल्या टेकडी पायथ्यावरील कोट्यवधींच्या जमिनीवर झोपड्यांचे अतिक्रमण झाले असून, ते काढण्याकडे सिडको दुर्लक्ष करत आहे.
तोडलेल्या झोपड्या पुन्हा उभारल्या
पारसिक टेकडीच्या पायथ्याशी शहाबाजगावातील दफनभूमीला लागूनही असलेल्या झोपड्यांवर एक महिन्यापूर्वी बेलापूर विभाग कार्यालयाने कारवाई केली होती. परंतु, कारवाई केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुन्हा त्या उभारण्यात आल्या.