टोल वाचवण्यासाठी वाहनांवर अनधिकृत दिवे
By Admin | Published: February 6, 2017 04:49 AM2017-02-06T04:49:26+5:302017-02-06T04:49:26+5:30
महामार्ग आणि इतरत्र होणाऱ्या पोलीस कारवायांपासून वाचविण्यासाठी आणि टोलमुक्त होण्यासाठी वाहनांवर पोलीस, महाराष्ट्र शासन,
सिकंदर अनवारे , दासगाव
महामार्ग आणि इतरत्र होणाऱ्या पोलीस कारवायांपासून वाचविण्यासाठी आणि टोलमुक्त होण्यासाठी वाहनांवर पोलीस, महाराष्ट्र शासन, केंद्र सरकार, पत्रकार आदी महत्त्वपूर्ण विभागाचे बोर्ड आणि दिव्यांचा वावर सर्रास करण्यात येत आहे. आरटीओच्या नियमाप्रमाणे खासगी वाहनांचा अशा प्रकारे नाव आणि दिव्यांचा वापर हा गुन्हा आहे. असे असताना अशा वाहनांची नाकेबंदी केली जात नाही. अशा पाट्या अगर दिव्यांच्या गाड्यांमध्ये कोणीतरी बडा असामी अगर अधिकारी असेल या भीतीने पोलीस देखील या वाहनांवर कारवाई करण्यास घाबरत आहेत. त्यामुळे आरटीओने या प्रकरणी विशेष मोहीम काढून कारवाई करावी, अशी मागणी सर्वसामान्यांकडून केली जात आहे.
संसदेत झालेला हल्ला हा लाल दिव्याच्या अॅम्बॅसिडर गाडीतून आलेल्या अतिरेक्यांनी केला होता. लाल दिव्याची अॅम्बॅसिडर होती म्हणून सुरक्षा रक्षकांनी अधिक चौकशी न करता गाडी संसद परिसरात सोडली होती. या घटनेची दखल घेत अनधिकृत दिव्यांचा वापर आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पाट्या लावण्यावर न्यायालयाने बंदी घातली होती. तसा आदेशही पोलीस आणि परिवहन विभागाला आला होता. मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये कारवाया झाल्या. हे प्रकरण लागलीच थंडावले त्यामुळे आजही सर्वत्र प्रेस, महाराष्ट्र शासन, केंद्र सरकार यासारख्या विविध कार्यालयांचे बोर्ड लावून खासगी वाहने फिरत आहेत. अनेक बडे सरकारी अधिकारी अशा प्रकारचा वापर आपल्या खासगी वाहनांवर करताना दिसत आहेत. त्यांना मिळणारी व्हीआयपी सुविधा बघून अनेक तोतयांनी देखील मान वर काढली आहे. पत्रकार, पोलीस अगर कोणत्याही शासकीय कार्यालयाशी संबंध नसताना हे तोतया आपल्या वाहनांवर अशा प्रकारच्या पाट्या अगर दिवे वापरत आहेत. रस्त्यावर पोलिसांनी अशा वाहनांना थांबवून विचारले असता शेखी मिरवत पोलीस कर्मचाऱ्यांशी हे हुज्जत देखील घालत असतात.
परिवहन विभागाच्या नियमाप्रमाणे अशा प्रकारच्या पाट्या अगर दिव्यांच्या वापरावरती निर्बंध असून क्षुल्लक कारवाईची अट आहे. तर अशा वाहनांवर केसेस करून न्यायालयासमोर हजर करणे आहे. मात्र या खात्याची आतापर्यंत अशा प्रकारे पाट्या किंवा दिवे लावणाऱ्यांवर कोणतीच कारवाई झाल्याचे दिसून येत नाही. उलट या कारवाईबाबत परिवहन विभाग पोलिसांकडे तर पोलीस परिवहन विभागाकडे बोट दाखवण्याचे काम करत आहे. यामुळे अशा पाट्या आणि दिवे लावणारे आणि त्याचा गैरफायदा घेणाऱ्यांचे चांगलेच फावले आहे. महामार्ग वाहतूक शाखा महाड यांच्याकडून उपलब्ध माहितीनुसार त्यांच्याकडे १ जानेवारी २०१६ ते ३१ डिसेंबर २०१६ या एक वर्षाच्या कालावधीत ९ हजार ८३९ केसेस वाहन चालकांवर करण्यात आल्या असून १० लाख २० हजार एवढी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली. या कारवाईमध्ये सीट बेल्ट, सिफ्लेक्टर वाहतुकीस अडथळा, वाहनासोबत क्लिनर नसणे, हेल्मेट बॅच नसणे, ड्रेस व तीन सीट केसेस झाल्या. दर दिवशी या महामार्गावरून शेकडो वाहने पोलीस पाटी, प्रेस, महाराष्ट्र शासन, कें द्र सरकार अशा अनेक पाट्या लावून यांच्यासमोरून जात आहेत. इतर कारवाया होत असताना देखील अनधिकृत दिवे आणि पाट्या लावणाऱ्यांवर कारवाई केली जात नसल्याने खंत व्यक्त करण्यात येत आहे.
अशा पाट्या अगर दिव्यांचा वापर करणाऱ्या वाहनांवर केवळ १०० रुपये इतक्या दंडाची कारवाई पूर्वी होती. आता नव्याने बदल केलेल्या १७७ व्या नियमाप्रमाणे २०० रुपये इतकी असून वाहनावरून दिवा तसेच पाटी व स्टीकर काढून टाकणे. वर्षभर पाट्यांचा आणि दिव्यांचा गैरवापर करणाऱ्या व्यक्तींनाही दंडात्मक रक्कम क्षुल्लक असून त्याचा काहीही फरक पडत नाही. तरी अशा वाहनांवर कायद्यात बदल करून कठोर कारवाईची गरज असल्याचे बोलले जात आहे.तोतया पत्रकारांचा
कारवाईत अडथळा
सध्या प्रत्येक ठिकाणी तोतया पत्रकारांचा सुळसुळाट सुरू आहे. कोणत्या तरी साप्ताहिकाचा किंवा अस्तित्वात नसलेल्या वृत्तपत्राचे कार्ड तयार करायचे आणि आपल्या खासगी वाहनावर प्रेस असे बोर्ड लावून आपल्या कार्डची धमक दाखवत फिरायचे, मात्र अशा प्रकारचे उद्योग तोतया पत्रकारांकडून मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. अशा तोतया पत्रकारांनी आपल्या वाहनांवर प्रेस असे स्टीकर लावून हैदोस घातला आहे. तरी अशा पत्रकारांची सखोल होवून यांच्यावर कारवाई करण्याची सामान्यांकडून मागणी करण्यात येत आहे.