नवी मुंबई : नवी मुंबई शहरात वाहनांच्या पार्किंगचे योग्य नियोजन नसल्याने मोठ्या प्रमाणावर समस्या निर्माण झाली आहे. नागरिक आणि वाहनांची वर्दळ असलेल्या ठिकाणी नो पार्किंगचे फलक बसविण्यात आले आहेत, परंतु नियमांचे उल्लंघन केले जात असून याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे शहरात अनेक ठिकाणी वाहतूककोंडीची समस्या निर्माण होत असून नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
नियोजनबद्ध शहर म्हणून नवी मुंबई शहराची ओळख आहे. शहरात वाढलेली लोकसंख्या आणि वाहनांची वर्दळ यामुळे शहराची निर्मिती करताना निर्माण करण्यात आलेल्या सुविधा अपुऱ्या पडू लागल्या असून विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. नवी मुंबई शहरात नागरिकांची आणि वाहनांची वर्दळ असलेल्या ठिकाणी वाहने पार्किंगचे नियोजन अपुरे असल्याने वाहने पार्किंगचा ताण परिसरातील रस्त्यांवर पडत आहे. त्यामुळे वाहतूककोंडीची समस्या निर्माण होत आहे. सदर समस्या टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी शहरातील अनेक ठिकाणी नो पार्किंग झोन घोषित केले असून, त्या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून नो पार्किंगचे फलक बसविले आहेत. परंतु अनेक ठिकणी नो पार्किंग झोनमध्ये वाहने पार्किंग केली जात आहेत. नेरूळ सेक्टर ४ येथे ग्रेट ईस्टर्न गॅलरी या इमारतीमध्ये विविध कंपन्यांची कार्यालये आहेत. या ठिकाणी होणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी नो पार्किंग झोन घोषित करण्यात आला आहे. परंतु इमारतीबाहेरील रस्त्याच्या कडेला वाहने उभी केली जातात. यामुळे वाहतूककोंडीची समस्या निर्माण होत आहे.
डी.वाय. पाटील महाविद्यालयाच्या शेजारी असलेल्या सर्व्हिस रस्त्यावरदेखील नो पार्किंगचे फलक बसविण्यात आले आहेत. या ठिकाणीदेखील नियमांचे उल्लंघन करून वाहने उभी केली जात आहेत. सीबीडी सेक्टर ११ आणि १५ भागातदेखील नो पार्किंगचे फलक बसविण्यात आले आहेत. या ठिकाणी असलेली विविध कार्यालये, बँका आणि हॉटेलच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर वाहने पार्किंग केली जात असून, यामुळे वाहतूककोंडीची समस्या निर्माण होत आहे. वाहतूक पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.