वैभव गायकर
पनवेल : 31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव साजरा होणार आहे. गणेशोत्सव काळात मुंबईहुन कोकणामध्ये जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र.66 वर गणेशभक्तांची आणि ची प्रचंड गर्दी असते. त्यामुळे गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर, सुरक्षित आणि विना अपघात व्हावा याकरिता 27 ते 31 ऑगस्ट या कालावधीत मुंबई- गोवा महामार्गावर 16 टन किंवा त्यापेक्षा अधिक वजन असलेल्या सर्व जड अवजड वाहनांच्या आवागमनावर बंदी घालण्यात आली आहे.या काळावधित पळस्पे फाटा मार्गावर अवजड वाहनांची अनधिकृत पार्किंग बंद होती.मात्र पुन्हा एकदा गुरुवार दि.1 पासुन मार्गावर अनधिकृत पार्किंगला सुरुवात झाली आहे.
गणेशोत्सव सुरु असल्याने अद्यापही कोंकणाकडे जाणाऱ्या वाहनांची वर्दळ सुरूच आहे. पळस्पे फाटा याठिकाणी पनवेल शहर वाहतूक शाखेच्या वाहतुक पोलिसांचा चोख बंदोबस्त असताना देखील वाहतूक पोलिसांच्या समोर सर्रास रस्त्यावर वाहने उभी केली जात आहेत.मात्र पोलीस कारवाई करीत नाहीत.सर्वसामान्य वाहन चालकांना वाहतूक नियमांचे धडे देत वाहतुक पोलीस मोठ्या संख्येने याटकानी कारवाई करीत असते मात्र अवजड वाहन चालकांनावाहतुकपोलीस विचारणा करीत नाहीत.अनधिकृत पार्किंगसाठी प्रत्येक वाहना मागे ठराविक रक्कम वसूल केली जाते.पार्किंग करणारे ट्रक चालक देखील याबाबत दुजोरा देतात मात्र या आर्थिक व्यवहारात वाहतुक पोलीस देखील सहभागी आहेत का ?असा प्रश्न निर्माण होत आहे.सर्रास वाहतुकीस अडथळा निर्माण करून थेट उड्डाणपुलावर वाहने पार्क करणाऱ्या वाहन चालकांवर वाहतुक पोलीस ठोस कारवाई का करीत नाहीत ? हा प्रश्न उपस्थित होत आहे.नवी मुंबई वाहतूक शाखेचे उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी हि अनधिकृत पार्किंग हटविण्याचे सूचना स्थानिक वाहतूक पोलिसांना दिल्या जातील अशी प्रतिक्रिया दिली होती.मात्र उपायुक्तांच्या सूचनांकडे देखील वाहतूक पोलीस अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे या अनधिकृत पार्किंगमुळे स्पष्ट होत आहे.