रुग्णालयाबाहेर बेकायदा पार्किंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 12:53 AM2018-12-12T00:53:04+5:302018-12-12T00:53:22+5:30
वाशीतील प्रकार; अपुऱ्या जागेमुळे रुग्ण, नातेवाइकांची वाहने पदपथावर
नवी मुंबई : वाशी येथील पालिकेच्या सार्वजनिक रुग्णालयाच्या आवारात वाहने पार्किंगची जागा अपुरी असल्याने रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना आणि नातेवाइकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून, रुग्णालयाबाहेरील पदपथ आणि रस्त्याच्या कडेला वाहने पार्किंग करावी लागत आहेत, त्यामुळे नागरिकांना पदपथावरून चालताना विविध समस्यांचा सामना करावा लागत असून, पालिका रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडीची समस्या उद्भवत आहे.
नवी मुंबई महापालिकेचे वाशी सेक्टर-१० येथे एकमेव सार्वजनिक रुग्णालय आहे. या रुग्णालयात उपचारासाठी नवी मुंबई तसेच इतर शहरांच्या विविध भागांतून अनेक रु ग्ण येतात. या रु ग्णालयात उपचारासाठी येणाºया रुग्णांची दिवसेंदिवस वाढती गर्दी लक्षात घेत, तसेच पालिकेच्या माध्यमातून चांगली आरोग्य सेवा देण्याकरिता पालिका प्रशासनाच्या माध्यमातून नेरुळ आणि ऐरोली येथे अत्याधुनिक आणि दर्जेदार रु ग्णालयाच्या इमारती उभारल्या आहेत; परंतु ही रुग्णालये पूर्ण क्षमतेने सुरू न झाल्याने वाशी येथील सर्वजनिक रुग्णालयावर रु ग्णांचा मोठा भार पडत आहे. वाशी येथील रु ग्णालयाचा काही भाग हिरानंदानी रुग्णालयाला करार करून देण्यात आला असल्याने पालिका रुग्णालयाच्या आवारातील पार्किंगची जागा अपुरी पडू लागली आहे. त्यामुळे डॉक्टर, पालिका कर्मचारी, रुग्णवाहिका अशाच वाहनांना रुग्णालयाच्या आवारात पार्किंगसाठी जागा देण्यात येते. रुग्णालयात तपासणीसाठी येणारे रुग्ण आणि रुग्णांना भेटण्यासाठी येणारे नातेवाईक यांना वाहने पार्किंगसाठी पालिका रुग्णालयाच्या आवारात जागा नसल्याने प्रवेश देण्यात येत नाही, त्यामुळे रुग्ण आणि नातेवाइकांची वाहने रुग्णालयाबाहेरील पदपथ आणि रस्त्याच्या कडेलाच उभी करण्यात येत आहेत. वाशी सेक्टर-१० हा गजबजलेला परिसर म्हणून ओळखला जातो. पालिका रुग्णालयाच्या परिसरात शाळा, कॉलेज, नागरीवस्ती असल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर नागरिकांची आणि वाहनांची वर्दळ असते. रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोरच रिक्षा स्टॅन्डही आहे, त्यामुळे गजबजलेल्या परिसरात वाहने रस्ते आणि पदपथावर उभी केल्यामुळे नागरिकांना ये-जा करताना अडचण निर्माण होत असून नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागत आहे. या भागात वाहतूककोंडीची समस्याही उद्भवत आहे. या परिसरात महापालिकेने पे अॅण्ड पार्कची सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही, त्यामुळे रुग्णालयात येणाºया नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पालिकेने या वाहनांसाठी पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिक करीत आहेत.