नवी मुंबई : क्वीन नेकलेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पामबीच मार्गावर मागील काही वर्षांत वाहनांची वर्दळ वाढली आहे. परंतु कोपरी सिग्नल ते सेलिब्रेशन हॉटेलपर्यंतच्या या मार्गावर वाहनांची दुतर्फा बेकायदा पार्किंग होत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली. त्यामुळे अपघातांची शक्यताही वाढली आहे. या प्रकाराकडे संबंधित प्रशासनाने सपशेल दुर्लक्ष केल्याने वाहनधारकांनी नाराजी व्यक्त केली आहे.वाशी ते बेलापूर दरम्यान १२ किमी लांबीचा पामबीच मार्ग वाहनधारकांसाठी पर्वणीचा ठरला आहे. विशेष म्हणजे हा मार्ग तयार करताना त्यावर कोणत्याही प्रकारची पार्किंग किंवा बाहेर पडण्यासाठी उपमार्ग नसतील, याची खबरदारी घेण्यात आली होती. वाहनधारकांना विनाअडथळा कमीत कमी वेळेत इच्छित ठिकाणी पोहचता यावे, हा यामागील हेतू होता. असे असले तरी मागील काही वर्षांत या हेतूला हरताळ फासला गेल्याचे दिसून आले आहे. कोपरी गावाजवळ या मार्गाच्या दोन्ही बाजूला कार बाजार थाटले आहेत. विक्रीसाठी ठेवलेली जुनी वाहने थेट पदपथावर उभी केली जातात. त्यामुळे या परिसरात नेहमीच वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. त्याचप्रमाणे बंद पडलेला पामबीच गॅलेरिया मॉल ते सेलिब्रेशन हॉटलेपर्यंतच्या मार्गावर दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात अनधिकृत वाहनांची पार्किंग केली जाते. विशेष म्हणजे अनेकदा दुहेरी रांगेत वाहनांची पार्किंग केली जात असल्याने त्याचा वाहनांना मोठा अडथळा होत आहे. तसेच या परिसरात रस्त्याला लागून असलेल्या वाहनांचे स्पेअर पार्ट विक्रीची दुकाने आणि गॅरेजमुळे जवळपास अर्धा किलोमीटरच्या रस्त्यावर नेहमीच चक्काजाम झाल्याचे पाहावयास मिळते.यासंदर्भात वाहनधारकांनी अनेकदा तक्रारी केल्या आहेत. परंतु त्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने वाहनधारकांनी नाराजी प्रकट केली आहे. (प्रतिनिधी)
पामबीच मार्गावर अनधिकृत पार्किंग
By admin | Published: July 07, 2016 3:07 AM