वाशी उड्डाणपुलाखाली पोलिसांकडूनच अनधिकृत पार्किंग, फर्निचर बनविण्याचा कारखानाही सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 07:32 AM2020-12-25T07:32:22+5:302020-12-25T07:33:02+5:30
Vashi : शासनाने मुंबईसह राज्यातील उड्डाणपुलाखाली वाहनतळ सुरू करण्यास मनाई केली आहे. याविषयी उच्च न्यायालयात याचिका दाखल होती.
- नामदेव मोरे
नवी मुंबई : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर उड्डाणपुलाखाली वाहने उभी करण्यास मनाई आहे. परंतु वाशीतील उड्डाणपुलाखाली वाहतूक पोलिसांनीच वाहने उभी करण्यास सुरुवात केली आहे. या ठिकाणी बेकायदा फर्निचर बनविण्याचा कारखानाही सुरू केला आहे. त्यामुळे पुलाची सुरक्षा धोक्यात आली आहे.
शासनाने मुंबईसह राज्यातील उड्डाणपुलाखाली वाहनतळ सुरू करण्यास मनाई केली आहे. याविषयी उच्च न्यायालयात याचिका दाखल होती. न्यायालयानेही पुलाखाली पार्किंगला मनाई केली आहे. न्यायालयाच्या निर्णयाचे उल्लंघन नवी मुंबईमध्ये केले जात आहे. वाहतूक पोलिसांनी पुलाखाली चौकी सुरू केली आहे. सुरुवातीला एकच चौकी होती. परंतु सद्यस्थितीमध्ये एकूण सहा कंटेनर केबिन पुलाखाली बसविण्यात आल्या आहेत. कारवाई केलेल्या मोटरसायकल पुलाखाली उभ्या केल्या जात आहेत. एखादी मोटरसायकल घातपाती कारवाईसाठी रोडवर उभी केली असेल व ती पोलिसांनी उचलून आणून पुलाखाली उभी केल्यामुळे दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत. याशिवाय दिवसभर येथे जवळपास १०० वाहने उभी असल्याचे दिसत आहे. पुलाखाली काही दिवसांपासून फर्निचर बनविण्याचा कारखाना सुरू केला आहे. येथील कारागिरांना विचारणा केली असता येथील फर्निचरची नवी मुंबई बाहेरही विक्री केली जात आहे. फर्निचर बनविण्यासाठी कोणी परवानगी दिली याविषयी विचारणा केली असता वाहतूक विभागातील एक पोलीस कर्मचाऱ्याचे नाव सांगण्यात आले. बिनधास्तपणे फर्निचर बनविले जात असून त्यावर पालिका व इतर प्रशासनही कार्यवाही करत नाही. येथेच एका ठेकेदाराने साईन बोर्ड, वाहतुकीच्या सूचना देणारे फलक, सिग्नलसाठीचे पोल व इतर वाहतूक सूचनांचे फलक बनविणारा कारखाना सुरू केला आहे. त्यासाठी वेल्डिंग मशीनचाही वापर केला जात आहे. यामुळेही दुर्घटनेची शक्यता आहे.
वीजवापराचीही चौकशी
पुलाखाली चौकी व इतर कंटेनर बॉक्ससाठी वीज वापरली जात आहे. फर्निचरसह साईन बोर्ड बनविण्यासाठी विजेचा वापर केला जात आहे. यासाठी वीजजोडणी पुलावरील फलक वा पथदिव्यातून घेतली जात असल्याची शक्यता आहे. उत्सवात मंडळांना शेजारच्या घरातून वीज घेऊन दिली जात नाही. मग, पुलाखालील उद्योगांना व चौक्यांना हा नियम का लागू नाही का? असा प्रश्न आहे.