नेरूळमधील रिक्षा स्टँडमध्ये अनधिकृत वाहनतळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 04:25 AM2018-07-10T04:25:20+5:302018-07-10T04:25:32+5:30

नेरूळ रेल्वे स्टेशनच्या पश्चिम बाजूला सिडकोने वाहनतळासाठी चार भूखंड उपलब्ध करून दिले आहेत. यानंतरही वाहन चालक रिक्षा स्टँडमध्ये व सर्व्हिस रोडवरही वाहने उभी करत आहेत.

Unauthorized parking in Rickshaw stand in Nerul | नेरूळमधील रिक्षा स्टँडमध्ये अनधिकृत वाहनतळ

नेरूळमधील रिक्षा स्टँडमध्ये अनधिकृत वाहनतळ

googlenewsNext

नवी मुंबई - नेरूळ रेल्वे स्टेशनच्या पश्चिम बाजूला सिडकोने वाहनतळासाठी चार भूखंड उपलब्ध करून दिले आहेत. यानंतरही वाहन चालक रिक्षा स्टँडमध्ये व सर्व्हिस रोडवरही वाहने उभी करत आहेत. रिक्षा संघटनांनी याविषयी आवाज उठविल्यानंतर सिडको व वाहतूक पोलीस गांभीर्याने लक्ष देत नसल्यामुळे याठिकाणी वारंवार वाहतूककोंडी होत आहे.
नवी मुंबईमधील शिस्तबद्ध रिक्षा स्टँडमध्ये नेरूळ रेल्वे स्टेशनच्या स्टँडचाही समावेश होतो. रिक्षा चालक रांगेचा नियम पाळत आहेत. नेरूळ विभाग रिक्षा चालक मालक कल्याणकारी संस्थेने रोज दोन स्वयंसेवक नेमून रिक्षा वाहतूक सुरळीत होईल याकडे लक्ष देण्यास सुरवात केली आहे. परंतु स्टँडमधील अनधिकृत पार्किंगमुळे रिक्षा चालकांना त्रास होवू लागला आहे. सिडकोने पश्चिम बाजूला वाहने उभी करण्यासाठी चार भूखंड राखीव ठेवले असून तेथे पे अँड पार्क सुरू केले आहेत. परंतु अनेक मोटारसायकल व कार चालक वाहनतळावर पैसे द्यावे लागत असल्यामुळे रिक्षा स्टँडमध्ये व सर्व्हिस रोडवरच वाहने उभी करू लागले आहेत. रिक्षा स्टँडमध्ये १०० पेक्षा जास्त मोटारसायकल उभ्या केल्या जावू लागल्या आहेत. यामुळे करावेकडे जाणाऱ्या रिक्षा चालकांना नाईलाजाने बसस्टॉपजवळ सर्व्हिस रोडवर स्टँड सुरू करावा लागला आहे.
पार्किंगच्या समस्येविषयी रिक्षा चालकांनी वारंवार सिडको प्रशासनाकडे व वाहतूक पोलिसांकडे पाठपुरावा केला आहे. रेल्वे स्टेशन परिसर सीवूड वाहतूक विभागाच्या अखत्यारीत येत आहे. परंतु त्यांच्याकडे टोइंग व्हॅनच नाही. यामुळे तुर्भे वाहतूक पोलिसांच्या टोइंग व्हॅनच्या सहाय्याने रोडवर वाहने उभी करणाºयांवर कारवाई केली जात आहे. परंतु
ही कारवाई अत्यंत त्रोटक स्वरूपाची आहे.

नेरूळ रेल्वे स्टेशनसमोर रिक्षा स्टँडमध्ये व सर्व्हिस रोडवर अनधिकृतपणे वाहने उभी केली जात आहेत. यामुळे रिक्षा वाहतुकीला अडथळा निर्माण होवू लागला आहे. येथील अनधिकृत पार्किंग बंद केले तर वाहतुकीची समस्या कायमस्वरूपी सुटेल.
- पद्माकर मेहेर,
अध्यक्ष, रिक्षा संघटना


रेल्वे स्टेशनसमोर सकाळी व सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. अधिकृत पे अँड पार्कची सुविधा असताना मोटारसायकल व कार चालक रोडवर वाहने उभी करत असून त्यांना चाप बसला पाहिजे.
- दत्तात्रेय फडतरे,
सचिव, रिक्षा संघटना

शासनाने परमीट खुले केल्यामुळे रिक्षांची संख्या वाढली आहे. स्टेशनसमोरील रिक्षा वाहतूक शिस्तबद्ध असावी यासाठी आम्ही नेरूळ विभाग रिक्षा चालक मालक कल्याणकारी संस्थेच्यावतीने प्रयत्न करत आहोत. प्रशासनाने अनधिकृत पार्किंग हटवून आम्हाला सहकार्य करावे.
- निवृत्ती म्हात्रे,
खजिनदार, रिक्षा संघटना

Web Title: Unauthorized parking in Rickshaw stand in Nerul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.