माथाडींच्या जागेवर अनधिकृत धार्मिक स्थळ
By admin | Published: January 18, 2016 02:23 AM2016-01-18T02:23:29+5:302016-01-18T02:23:29+5:30
शहरात अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा धडाका सुरू असतानाही माथाडींच्या जागेवर झालेले अतिक्रमण हटण्याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे
नवी मुंबई : शहरात अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा धडाका सुरू असतानाही माथाडींच्या जागेवर झालेले अतिक्रमण हटण्याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. दीड वर्षापूर्वी सिडकोने माथाडींना घरांसाठी वितरीत केलेल्या ओट्यांवर अनधिकृत धार्मिक स्थळ बांधण्यात आले आहे. यासंबंधीची तक्रार सिडकोकडे करूनही ते हटवण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप माथाडी कामगारांकडून होत आहे.
शासनाने मंजूर केलेल्या घर वाटपातल्या घोटाळ्यानंतर सुमारे १० वर्षांनी माथाडी कामगारांना नुकतेच घरांचे वाटप झाले आहे. तिसऱ्या टप्प्याच्या या वाटपात सुमारे ४७१ घरांचे वितरण सिडकोतर्फे झाले आहे. मात्र निर्णयाअभावी घरांसाठी आखलेले हे ओटे सुमारे ३० वर्षांहून अधिक काळ आहे त्या स्थितीत पडून होते. त्यामुळे बहुतांश ओट्यांवर अतिक्रमण व डेब्रिजचे ढीग साचलेले आहेत. त्यामुळे ओटे मिळूनही त्यावर घर बांधण्यासाठी अद्यापही काहींच्या पदरी निराशाच पडली आहे. वितरीत झालेल्या ओट्यांवरील अतिक्रमण हटवण्याची मागणी करूनही सिडकोचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. माथाडी कामगार शैलेश भोसले व भिवा उंबरकर हे दोघे गेली दोन वर्षे सिडकोकडे पाठपुरावा करत आहेत. त्यांना कोपरखैरणे सेक्टर १ येथील ५३ व ५४ क्रमांकाच्या ओट्यांचे वितरण झाले आहे. घरासाठी जागा मिळाल्याने त्यांचा आनंद गगनाला मावेनासा झाला होता. राहण्याची सोय नसल्याने गावी ठेवलेले कुटुंब यानिमित्ताने त्यांच्या नजरेसमोर येणार होते. यासाठी जेवढ्या लवकर घर बांधून पूर्ण होईल, तेवढ्या जलद गतीने ते पूर्ण करायची स्वप्ने ते रंगवू लागले होते. मात्र जागा मिळूनही घराचे स्वप्न पूर्ण होण्यात प्रत्यक्ष देवानेच अडथळा केला आहे. मिळालेल्या ओट्याची सर्व प्रक्रिया पूर्ण करून त्यांनी सिडकोकडे शुल्क देखील भरले. मात्र प्रत्यक्षात जागेची पाहणी केली असता त्यावर अनधिकृत मंदिर असल्याचे समोर आले. हे अनधिकृत मंदिर हटवण्याची त्यांनी संबंधित संघटनेकडे मागणी करूनही त्यांना दाद मिळालेली नाही. अखेर त्यांनी यासंबंधीची तक्रार कामगार युनियन तसेच सिडकोकडे केली. युनियनने देखील याची दखल घेत सिडकोकडे माथाडींच्या जागेवरील अतिक्रमण हटवण्याची मागणी केलेली आहे. त्यानंतरही अतिक्रमण हटवण्यात सिडको विलंब लावत असल्याचा संताप माथाडी कुटुंबांकडून होत आहे.