बेकायदा रिक्षा स्टॅण्डचा अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 03:47 AM2019-01-11T03:47:54+5:302019-01-11T03:48:09+5:30
आरटीओचे दुर्लक्ष : नेरुळमध्ये वाहतूककोंडीमुळे नागरिक त्रस्त
नवी मुंबई : शहरातील रिक्षांची संख्या वाढत आहे; परंतु अधिकृत रिक्षा स्टॅण्डची संख्या कमी असल्याने शहरातील अनेक भागात बेकायदेशीरपणे रिक्षा स्टॅण्डची निर्मिती करण्यात आली आहे. नेरुळ भागात रहिवासी सोसायट्या, शाळा, महाविद्यालये आणि रेल्वेस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर बेकायदा रिक्षा स्टॅण्ड बनविण्यात आले आहेत. बेकायदा रिक्षा स्टॅण्डकडे आरटीओचे दुर्लक्ष झाले असून, वर्दळीच्या ठिकाणी वाहतूककोंडीच्या समस्या निर्माण होत असून पादचारी त्रस्त झाले आहेत.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये रिक्षा व्यवसायाचा समावेश असून, नवी मुंबई शहरातील प्रवासी रिक्षा पर्यायाचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. नवी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये सप्टेंबर २०१७ पूर्वी १२९९० अधिकृत रिक्षा होत्या. त्या वेळी १६२ अधिकृत रिक्षा स्टॅण्ड होते. शासनाने रिक्षा परवाने खुले केल्यावर नवी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये रिक्षांच्या संख्येत सुमारे चार हजारांहून अधिक संख्येने वाढ झाली; परंतु स्टॅण्डची संख्या वाढविण्यात आलेली नाही. त्यामुळे रिक्षा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनी रहिवासी सोसायट्या, शाळा, महाविद्यालये आणि रेल्वेस्थानक परिसरात बेकायदा रिक्षा स्टॅण्डची निर्मिती केली आहे. नेरु ळ रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेला स्थानकाबाहेर तीन अधिकृत वाहन पार्किंग तळ आहेत, यामधील जागेत काही ठिकाणी बेकायदेशीरपणे वाहने पार्किंग केली जात असून याच भागात चारहून अधिक रिक्षा स्टॅण्ड बनविण्यात आले आहेत. यामधून रेल्वेस्थानकात वाट काढत प्रवाशांना रेल्वे स्थानकात ये-जा करावी लागत आहे, तसेच अनेक सिडको आणि खासगी वसाहती, शाळा, महाविद्यालयांबाहेरही रिक्षा स्टॅण्ड बनविण्यात आले आहेत, यामुळे वर्दळीच्या वेळी नागरिकांना वाहतूककोंडी सारख्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. आरटीओने बेकायदा रिक्षा स्टॅण्डवर कारवाया कराव्यात, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
शहरात रिक्षांची संख्या वाढली आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी बेकायदा रिक्षा स्टॅण्ड बनविण्यात आले आहेत, यामुळे रेल्वे स्थानकांसारख्या ठिकाणी नागरिकांना, प्रवाशांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. रिक्षा संघटनांनी आरटीओकडे अधिकृत रिक्षा स्टॅण्डची मागणी करावी.
- किशोर पवार, प्रवासी, नेरु ळ