नवी मुंबई : पालिकेने अनधिकृत शाळांची यादी प्रसिद्ध करूनही अनेक शाळांनी पालिकेला न जुमानता शाळा सुरूच ठेवल्या आहेत. अशा शाळांवर दंडात्मक कारवाईचा इशारा देऊन पालिकेने तत्काळ शाळा बंद करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. तर विनापरवाना शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी लगतच्या मान्यताप्राप्त शाळेत प्रवेश घेण्याचेही आवाहन केले आहे.शिक्षण क्षेत्राचे बाजारीकरण झाल्याने शहरात खासगी विनापरवाना शाळांचेही पेव सुटले आहे. शिक्षणाच्या नावाखाली पालकांकडून भरमसाठ शुल्क आकारून या शाळा कसल्याही परवानगीविना चालवल्या जात आहेत. त्यापैकी बहुतांश शाळांकडून विद्यार्थ्यांना कसल्याही सुुविधा पुरवल्या जात नाहीत. तर रहिवासी जागा, व्यावसायिक गाळे या ठिकाणी विद्यार्थ्यांचा कोंडवाडा करून या शाळा चालवल्या जात आहेत. मागील अनेक वर्षांपासून शहरातील अशा विनापरवाना शाळांची पालिकेकडून यादी प्रसिद्ध केली जाते. मात्र, पालिकेच्या शिक्षण विभागाकडून ठोस कारवाई होत नसल्याने वर्षानुवर्षे अशा शाळा सुरूच आहेत; परंतु या शाळा विनापरवाना असल्याने त्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ शकते, त्यामुळे अखेर पालिकेने अशा शाळांवर कारवाईची ठोस भूमिका घेत त्यांना नोटिसा बजावल्या आहेत. पालिका क्षेत्रात अद्यापही १६ शाळा विनापरवाना सुरू असून, त्यात १५ शाळा इंग्रजी माध्यमाच्या आहेत. तर घणसोलीतील सरस्वती विद्यानिकेतन व नेरुळच्या राईट वे इंग्लिश या दोन शाळेचे परवानगी प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.पाल्याने इंग्रजीतूनच शिक्षण घ्यावे, या स्पर्धेत पालकांचे कॉन्वेंट शाळांकडील वाढते आकर्षण लक्षात घेऊन या इंग्रजी माध्यमाच्या शाळा विनापरवाना चालवल्या जात आहेत. त्यानुसार सर्व विनापरवाना शाळा तत्काळ बंद करण्याच्या नोटिसा पालिकेने बजावल्या आहेत. ३० जूननंतर या शाळा सुरू राहिल्यास शाळा व्यवस्थापनावर एक लाख रुपये दंडाच्या कारवाईचा इशारा दिला आहे. शिवाय, त्यानंतरही शाळा सुरू राहिल्यास प्रतिदिन दहा हजार रुपये दंड आकारला जाईल, असाही इशारा देण्यात आलेला आहे. तर चालू शैक्षणिक वर्षासाठी त्या ठिकाणी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी लगतच्या मान्यताप्राप्त शाळेत प्रवेश घेण्याचेही आवाहन केले आहे; परंतु पालिकेच्या कारवाईच्या इशाºयानंतरही किती विनापरवाना शाळा प्रतिसाद देतील, याबाबतही साशंकता आहे.विनापरवाना शाळांची यादी- अल मोमिन स्कूल, बेलापूर- आॅर्किड इंटरनॅशनल स्कूल, कोपरी- आदर्श कॉन्व्हेंट स्कूल, महापे गाव- सेंट जुडे स्कूल, घणसोली गाव- सरस्वती विद्यानिकेतन स्कूल, घणसोली- अचिएवर्स वर्ल्ड प्रायमरी स्कूल, घणसोली- प्रशिक इंग्लिश स्कूल, रबाळे- कातकरी पाडा- आॅस्टर इंटरनॅशनल स्कूल, कोपरखैरणे- नवी मुंबई ख्रिश्चन इंग्लिश स्कूल,तुर्भे स्टोअर- राईट वे इंग्लिश स्कूल, नेरुळ- सेंट झेविअर्स स्कूल, नेरुळ- इकरा इंटरनॅशनल स्कूल, नेरुळ- इलिम इंग्लिश स्कूल, रबाळे-आंबेडकरनगर- रोझ बर्ड स्कूल, तुर्भे स्टोअर- दिल्ली पब्लिक वर्ल्ड स्कूल, नेरुळ- एन.पी.एस. स्कॉलर अॅकॅडमी, घणसोली गाव
विनापरवाना शाळांवर होणार कारवाई, महापालिकेने बजावल्या नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2018 3:28 AM