उघड्यावरच्या खाद्यपदार्थांमुळे आरोग्य धोक्यात, अनधिकृत स्टॉल्सना अभय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 02:21 AM2020-03-18T02:21:30+5:302020-03-18T02:21:40+5:30
खाद्यपदार्थांच्या अनधिकृत स्टॉल्सना मात्र अभय दिले जात आहे. रात्री उशिरापर्यंत या स्टॉल्सवर गर्दी दिसू लागली आहे. स्वच्छतेच्या नियमांचेही उल्लंघन केले जात असल्यामुळे साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
- नामदेव मोरे
नवी मुंबई : गर्दी टाळण्यासाठी मॉल्स व इतर अधिकृत दुकाने बंद करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. दुसरीकडे प्रत्येक नोडमधील खाद्यपदार्थांच्या अनधिकृत स्टॉल्सना मात्र अभय दिले जात आहे. रात्री उशिरापर्यंत या स्टॉल्सवर गर्दी दिसू लागली आहे. स्वच्छतेच्या नियमांचेही उल्लंघन केले जात असल्यामुळे साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
नवी मुंबईमध्येही कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर प्रशासनाने जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. शहरातील तरण तलाव, मॉल्स, चित्रपटगृहे, सार्वजनिक, धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. शहरात जमावबंदी आदेश लागू केला आहे. गर्दी होत असलेली दुकाने बंद करण्याच्या सूचनाही दिल्या जात आहेत. परंतु अधिकृत मॉल्स व इतर दुकाने बंद करताना शहरातील प्रत्येक नोडमधील अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रेत्यांवरील कारवाईकडे मात्र दुर्लक्ष केले जाऊ लागले आहे. महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये सीबीडी बेलापूर, सीवूड, नेरूळ पूर्व व पश्चिम, जुईनगर, सानपाडा, एपीएमसी, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली ते दिघापर्यंत ५०० पेक्षा जास्त खाद्यपदार्थ विक्रेते व्यवसाय करत आहेत. यामध्ये पाणीपुरी, वडापाव, पुरीभाजीपासून ते इतर पदार्थांचा समावेश आहे. रोडवरच हे पदार्थ तयार केले जात आहेत. ग्राहकांनी ज्या डिशमध्ये हे पदार्थ खाल्ले त्या डिश,चमचे व्यवस्थित न धुता पुन्हा वापरल्या जात आहेत. पिण्याच्या पाण्याचे ग्लासही धुतले जात नाहीत. वास्तविक रोडवर भांडी धुण्यासाठी पुरेशी यंत्रणाच नाही. यामुळे दिवसभर एक बादली पाण्यामध्येच वारंवार डिश व चमचे धुऊन ते ग्राहकांना दिले जात आहेत.
शहरातील फूडगल्ली व खाद्यपदार्थ विक्रीच्या स्टॉल्सवर दिवसभर हजारो नागरिक एकत्र येत आहेत. काही चायनिज ढाब्यांवर एकाच वेळी ४० ते ५० ग्राहक बसलेले असतात. फालुदा, मेवाड आइस्क्रीम व इतर विक्रेत्यांच्या स्टॉल्सजवळही गर्दी होत असते. अस्वच्छतेमुळे व गर्दीमुळे साथीचे आजार वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नवी मुंबईत अन्न व औषध प्रशासनाचे कार्यालय नाही. ठाणेमधून या विभागाचे अधिकारी नियमित कारवाई करत नाहीत. महानगरपालिकेच्या विभाग कार्यालय स्तरावरून ठोस कारवाई केली जात नाही. राजकीय व प्रशासनातील काही कर्मचाऱ्यांचे अभय मिळत आहे.
परिमंडळ एकची समस्या गंभीर
महानगरपालिकेच्या परिमंडळ एकमध्ये अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रेत्यांची समस्या गंभीर झाली आहे. प्रत्येक प्रभाग व नोडमध्ये विक्रेत्यांनी पदपथ व रस्ते अडविले आहेत.
बेलापूर, नेरूळ, तुर्भे व वाशी विभाग कार्यालयाकडून गांभीर्याने कारवाई केली जात नाही. याविषयी माहिती घेण्यासाठी परिमंडळ एकचे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांच्याशी संपर्क साधला परंतु संपर्क होऊ शकला नाही.
परिमंडळ दोन परिसरामध्ये अनधिकृत फेरीवाले व खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर नियमित कारवाई केली जात आहे. अस्वच्छता पसरविणाºया विक्रेत्यांवरील कारवाई यापुढेही तीव्र केली जाईल.
- अमरिश पटनिगिरे,
परिमंडळ दोन उपआयुक्त
पोलिसांचीही पक्षपाती कारवाई
शहरात जमावबंदी आदेश लागू केला असल्यामुळे गर्दी होणारी चहाची दुकानेही बंद करण्यास सुरुवात केली आहे. एनआरआय पोलिसांनी सीवूड रेल्वे स्टेशनसमोरील येवले चहाचे दुकान बंद केले आहे.
परंतु याच दुकानाच्या बाजूला असलेले आनंद डेरी, तिरूपती फूड्स येथे प्रचंड गर्दी होत असतानाही ते सुरू ठेवले आहेत. सीवूड वगळता येवलेची इतर दुकानेही सुरू आहेत. पोलीस व महानगरपालिका प्रशासनाने जमावबंदी आदेश व शासन आदेशाच्या नावाने पक्षपाती कारवाई करू नये, अशी मागणी केली जात आहे.