महापालिका कार्यालयामध्ये विजेचा होतोय गैरवापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 12:11 AM2019-05-17T00:11:55+5:302019-05-17T00:12:50+5:30
नवी मुंबई महापालिकेने शहरात विविध कार्यालये, शाळा, रुग्णालयाच्या इमारती बांधल्या आहेत. या ठिकाणी विजेची देखील चांगल्या प्रकारे सोय करण्यात आली आहे.
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेने शहरात विविध कार्यालये, शाळा, रुग्णालयाच्या इमारती बांधल्या आहेत. या ठिकाणी विजेची देखील चांगल्या प्रकारे सोय करण्यात आली आहे. परंतु अनेक ठिकाणी वापर नसताना व बंद कार्यालयातील देखील विजेवर चालणारी उपकरणे सुरू ठेवण्यात येत असून विजेचा अनाठायी वापर केला जात आहे. या प्रकाराकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने महापालिकेचे आर्थिक नुकसान देखील होत आहे.
नवी मुंबई शहरात नागरिकांना दर्जेदार सुविधा देण्याच्या दृष्टीने पालिकेची कार्यालये, समाज मंदिर, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, रु ग्णालय, शाळा आदींच्या प्रशस्त इमारती उभारल्या आहेत. या वास्तूंना साजेशी विद्युत सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामधील काही इमारतींमध्ये सोलर सिस्टीमचा वापर केला जात असून अनेक ठिकाणी विजेचा वापर केला जात आहे. विजेच्या कमतरतेमुळे राज्यातील अनेक ग्रामीण भागात लोड शेडिंग केली जात असताना शहरांमधील पालिका कार्यालयांमध्ये विजेचा अनाठायी वापर केला जात आहे. महापालिकेने निर्माण केलेल्या इमारतींमध्ये दिवसा पुरेसा प्रकाश राहावा यासाठी खिडक्यांचा आकार मोठा ठेवण्यात आला आहे. परंतु आवश्यकता
नसलेले पंखे, विद्युत दिव्यांसारखी उपकरणे सुरू ठेवली जात आहेत. या इमारतींमधील काही बंद
असलेल्या दालनांमधील तसेच इमारतींच्या वापर नसलेल्या मजल्यावरील देखील पंखे आणि विद्युत दिवे सुरू राहात आहेत.
विविध इमारतींमधील खुल्या सभागृहातील देखील विजेची उपकरणे सुरू ठेवण्यात येत असून या सर्व प्रकाराकडे त्या ठिकाणच्या मुख्य अधिकाऱ्यांचे देखील दुर्लक्ष झाले आहे. यामुळे आवश्यकता नसताना महापालिकेच्या माध्यमातूनच विजेचा अनाठायी वापर केला जात असून विजेच्या बिलापोटी महापालिकेला आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.