बेशिस्त चालकांवर गुन्हे दाखल, १६८ जणांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2018 04:09 AM2018-11-07T04:09:10+5:302018-11-07T04:09:21+5:30
विरुद्ध दिशेने वाहने चालवणाऱ्या १६८ चालकांविरोधात वाहतूक पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. चालकांमध्ये वाहतुकीच्या नियमांची शिस्त लागावी, या उद्देशाने ही मोहीम राबवण्यात आली.
नवी मुंबई - विरुद्ध दिशेने वाहने चालवणाऱ्या १६८ चालकांविरोधात वाहतूक पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. चालकांमध्ये वाहतुकीच्या नियमांची शिस्त लागावी, या उद्देशाने ही मोहीम राबवण्यात आली. वाहतुकीचा नियम तोडल्याने पहिल्यांदाच गुन्हे दाखल
होत असल्याने बेशिस्त वाहनचालकांनी कारवाईचा धसका घेतला आहे.
बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्याचे वाहतूक पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे. अशा चालकांवर अनेकदा दंडात्मक कारवाया करूनही त्यांना शिस्त लागत नसल्याचे जागोजागी पाहायला मिळत आहे. त्यामुळे वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करणाºयांवर गुन्हे दाखल करण्याची मोहीम वाहतूक पोलीस उपआयुक्त सुनील लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली. त्यानुसार अवघ्या दीड महिन्याच्या कालावधीत विरुद्ध दिशेने वाहने चालवणाºया १६८ चालकांवर कलम २७९ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्या सर्वांवर सध्या खटले सुरू आहेत.
ज्या ठिकाणी विरुद्ध दिशेने वाहने चालवली जातात अशा ठिकाणी वाहतूक पोलिसांकडून बंदोबस्त लावला जात आहे. या वेळी विरुद्ध दिशेने वाहन चालवणाºया चालकाला संबंधित पोलीसठाण्यात नेऊन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यानंतर जामिनावर चालकाची सुटका करून त्याच्याविरोधात न्यायालयात चार्जशिट दाखल केली जात आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिसांकडून होणाºया दंडात्मक कारवाईला न घाबरणाºयांनीही या कारवायांचा धसका घेतला आहे.
शहरातील वाशी हे मध्यवर्ती ठिकाण असून, तिथल्या मुख्य रस्त्यावर धावणाºया रिक्षांसह दुचाकीस्वारांच्या बेशिस्तीचा सर्वसामान्यांना त्रास होतो. विरुद्ध दिशेने तसेच वेडीवाकडी वाहने चालवली जात असल्याने छोट्या-मोठ्या अपघाताच्या घटनाही घडत आहेत.
बेशिस्त चालकांना आवर घालण्याच्या उद्देशाने वाशी विभागात राबवण्यात आलेल्या मोहिमेत २१ जणांवर गुन्हे दाखल झाल्याचे वाहतूक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक सतीश गायकवाड यांनी सांगितले. त्यानंतरही ज्या चालकांना शिस्त अंगवळणी पडत नाही, अशांवरही कायद्याचा धाक करण्यासाठी विविध कलमांतर्गत अधिकाधिक रकमेचा दंड वसूल केला जात आहे.
अशा कारवाया सातत्याने प्रत्येक विभागात होत असल्याने बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लागेल,
असा विश्वास वाहतूक शाखेचे उपआयुक्त सुनील लोखंडे यांनी व्यक्त केला आहे.