नवी मुंबई : शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या दृष्टीने महापालिकेने कंबर कसली आहे. शहराच्या सौंदर्याला बाधा निर्माण करणाऱ्या अनियमित प्रकारांना आळा घालण्यासाठी पावले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रस्त्यावर दुतर्फा होणाऱ्या बेशिस्त पार्किंगला शिस्त लावण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. वाहतूक विभागाच्या सहकार्याने महापालिकेने यासंदर्भात ठोस कार्यवाही सुरू केली आहे. महापालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी रस्त्यांच्या कडेला दोन्ही बाजूने वाहने उभी केली जातात. त्यामुळे रहदारीला अडथळा होवून नियमित वाहतूक कोंडी होत आहे. विशेषत: वसाहतीअंतर्गतच्या अरूंद रस्त्यांवर ही समस्या गंभीर बनली आहे. यासंदर्भात रहिवाशांच्या सातत्याने तक्रारी येत आहेत. रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी केल्याने दैनंदिन साफसफाईच्या कामात अडथळा येत आहे. त्यामुळे स्वच्छ शहर या संकल्पनेला खीळ बसताना दिसत आहे. रस्त्यांच्या दोन्ही बाजूला वाहने उभी केल्याने तातडीच्या प्रसंगी रूग्णवाहिका व अग्निशमन दलाच्या वाहनांना मार्ग काढताना कसरत करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रहदारीच्या रस्त्यांवर सम-विषम, वन साईड पार्किंग, वन वे-टू वे वाहतूक तसेच नो पार्किंग क्षेत्र आदी योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक भागात त्याची कार्यवाही सुध्दा सुरू करण्यात आली आहे. ठिकठिकाणी नो पार्किंगचे सूचना फलकही लावले आहेत. नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.सुंदर व स्वच्छ शहरासाठी नागरिकांना आवाहनशहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या दृष्टीने महापालिकेन पावले उचलली आहेत. त्या अनुषंगाने फेरीवाले, अतिक्रमणे,डेब्रिज, बेकायदा होर्डिंग्ज याविरोधात जोरदार मोहीम राबविली जात आहे. येत्या ४ जानेवारीपासून स्वच्छ शहर अभियानाअंतर्गत सर्वेक्षण सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईकरांनी आपली जबाबदारी ओळखून सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.रस्त्यांवर ट्रक, कंटेनर, स्कूल बसेस उभ्या केल्या जात असल्याने त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. यापुढे अशी वाहने पार्किंगच्या जागेवरच उभी करावीत, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिकेने दिला आहे. बेवारस वाहनांवर कारवाईचा बडगाच्रस्त्यांवर बेवारस पडून असलेल्या वाहनांच्या विरोधातही महापालिकेने कंबर कसली आहे. काही वाहने वर्षानुवर्षे एकाच जागेवर पडून आहेत. अशा वाहनांच्या मालकांना महापालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. यापुढील काळात अशाप्रकारे एकाच जागेवर अनेक दिवस उभ्या असणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचे संकेत महापालिकेने दिले आहेत. ही वाहने उचलून तुर्भे येथील क्षेपणभूमीवर नेण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे बेवारस वाहनांबाबत आरटीओकडून त्यांच्या क्र मांकावरून त्यांचे मालक शोधून त्यांच्याविरोधात कडक कायदेशीर कारवाई करण्यात करण्यात येणार आहे. पदपथ पार्किंगमुक्त शहरातील बहुतांशी पदपथांवर विविध प्रकारचे अतिक्रमण झाले आहे. काही ठिकाणी पदपथांवर दुचाकी वाहने उभी केली जातात. च्विशेषत: गृहनिर्माण सोसायट्यांच्या समोरील पदपथांवर हा प्रकार सर्रासपणे दिसून येतो. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर पदपथांवरील वाहन पार्किंगलाही प्रतिबंध घालण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. स्टील्टच्या जागेचा पार्किंगसाठी वापर च्शहरातील अनेक इमारतींमध्ये पार्किंगसाठी स्टील्टच्या जागा आहेत. परंतु या जागेवर अनधिकृत बांधकाम करून त्याचा वाणिज्य व व्यावसायिक वापर होत असल्याचे पालिकेच्या निदर्शनास आले आहे. स्टीलच्या जागेवर अतिक्रमण झाल्याने इमारतीतील रहिवाशांना आपली वाहने रस्त्यावर उभी करावी लागत आहेत. त्यामुळे इमारतीच्या समोरील रस्त्यांवर नेहमीच वाहतूक कोंडी होताना दिसत आहे. याची गंभीर दखल महापालिका आयुक्तांनी घेतली आहे. त्यानुसार इमारतीतील स्टील्टच्या जागा पार्किंगसाठी खुल्या करण्याचे आवाहन त्यांनी सोसायटीधारकांना केले आहे.
बेशिस्त पार्किंगला लागणार शिस्त
By admin | Published: December 26, 2016 6:34 AM