बेवारस वाहने होणार जप्त, दहा दिवसांची मुदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 02:44 AM2018-04-10T02:44:02+5:302018-04-10T02:44:02+5:30
कळंबोली स्टील मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात बंद पडलेली वाहने तसेच त्यांचे सुटे भाग पडून आहेत. त्याचा रहदारीला अडथळा निर्माण होवून वाहतूककोंडी होते.
कळंबोली : कळंबोली स्टील मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात बंद पडलेली वाहने तसेच त्यांचे सुटे भाग पडून आहेत. त्याचा रहदारीला अडथळा निर्माण होवून वाहतूककोंडी होते. याबाबत पनवेल महानगरपालिका आणि बाजार समितीने ठोस पाऊल उचलले आहे. दहा दिवसांत ही वाहने हटवली नाही तर ती जप्त करून लिलाव करण्याचा इशारा मनपा आयुक्त आणि समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिला आहे.
सर्वात मोठे लोह-पोलाद मार्केट असल्याने कळंबोली स्टील मार्केट परिसरात दररोज हजारो ट्रक, ट्रेलर मालाची चढ-उतार करण्याकरिता येतात. यापैकी बहुतांशी वाहने सर्व्हिस रोडच्या कडेला उभी केली जातात. दोनही बाजूने वाहने उभी करण्यात आल्याने वाहतूककोंडी होते.
अंतर्गत रस्त्याबरोबर सर्व्हिस रोडवर बंद पडलेले ट्रक, ट्रेलर मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे रहदारीला अडथळे निर्माण होतात. काही वर्षांपूर्वी सिडको, वाहतूक पोलीस, स्थानिक पोलीस आणि लोह पोलाद मार्केटने संयुक्त मोहीम हाती घेतली होती. त्यानंतर मात्र अशी मोहीम राबविण्यात आली नाही. अशा वाहनांमुळे मार्केटमध्ये रहदारीला अडथळा निर्माण होत आहे.
महापालिका, बाजार समितीच्या संयुक्त बैठकीत हा विषय चर्चेला आला होता. त्याशिवाय समितीच्या बैठकीत या वाहनांवर कारवाई करण्याचा ठराव घेण्यात आला होता. मनपा आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्याकडे सुध्दा तक्र ारी आल्या होत्या. तसेच बाजार समितीचे चेअरमन गुलाबराव जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी विकास रसाळ यांनी याकामी पुढाकार घेतला. त्यानुसार बाजार समिती आणि पनवेल महापालिकेने संयुक्त पत्रक प्रसिध्द केले आहे. त्यामध्ये बाजार समितीच्या आवारात बेवारस, नादुरुस्त, भंगार अवस्थेतील, खराब झालेली तसेच वापरात नसलेली वाहने उभी करण्यात आलेली आहेत. त्यांचे सुटे भाग सुध्दा अनेक ठिकाणी कित्येक कालावधीपासून पडलेले आहेत.
बेवारस वाहने हटवण्यासंदर्भात बाजार समितीचे पदाधिकारी आणि अधिकाºयांसोबत दोन ते तीन बैठका झाल्या आहेत. बंद पडलेली वाहने तसेच त्यांच्या सुट्या भागाचा रहदारीला अडथळा होत आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आरटीओ, वाहतूक पोलिसांना बरोबर घेवून बाजार समिती आणि महापालिकेकडून पुढील कारवाई केली जाईल. ही समस्या निकाली काढण्याच्या दृष्टीने ठोस भूमिका घेण्यात आली आहे.
- जमीर लेंगरेकर, उपायुक्त, पनवेल महानगरपालिका