महास्वच्छता अभियानांतर्गत कळंबोलीत कचरा, डेब्रिज उचलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 01:09 AM2019-06-05T01:09:34+5:302019-06-05T01:09:39+5:30
पनवेल महापालिका क्षेत्रात १० जूनपर्यंत मोहीम : एकूण २० प्रभाग करणार चकाचक
कळंबोली : पनवेल महापालिका क्षेत्रांत सुरू करण्यात आलेल्या महास्वच्छता अभियानांतर्गत मंगळवारी कळंबोलीतील कचरा, डेब्रिज उचलण्यात आले. महापालिका व रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने १० जूनपर्यंत २० प्रभागांमध्ये हे अभियान राबवण्यात येणार आहे. मंगळवारी कळंबोली येथील प्रभाग ६,७,८ या प्रभागात सकाळी ७ वाजता अभियानाची सुरुवात करण्यात आली. प्रभागामधील रस्ते साफसफाई, गटार, पदपथ, मोकळा भूखंड, सार्वजनिक गार्डन स्वच्छ करण्यात आले. सहा जेसीबी, सहा डम्पर, चार टिप्पर, २९० कर्मचाऱ्यांसह कळंबोली वसाहतीत साफसफाई करण्यात आली. या वेळी नगरसेविका मोनिका महानवर, नगरसेवक राजू शर्मा, माथाडी कामगार नेते राजेंद्र बनकर, भाजपचे शहराध्यक्ष रवि पाटील, उपाध्यक्ष प्रशांत रणावरे, नितीन काळे त्याचबरोबर आरोग्य निरीक्षक दौलत शिंदे, प्रभाग अधिकारी प्रकाश गायकवाड, मनोज चव्हाण, दीपक शिलकंद, संतोष सोनवणे, योगेश कस्तुरे आदी उपस्थित होते.
९० डम्पर डेब्रिज जमा
कळंबोली येथील चार प्रभागांमधून ९० डम्पर डेब्रिज जमा करण्यात आले आहे. हे डेब्रिज सेक्टर २० येथील सिडकोच्या मोकळ्या भूखंडावर जमा करण्यात आले आहे.