नवी मुंबई : अपघाताच्या बहाण्याने फुटबॉलपट्टूला लुटणाऱ्या दोघांना तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरलेली सोन्याची चैन व गुन्ह्यासाठी वापरलेली मोटरसायकल हस्तगत केली आहे.
नेरूळमध्ये राहणाऱ्या रिचर्डसन लोबो (२८) या फुटबॉलपट्टू सोबत हा प्रकार घडला होता. रुग्णालयात दाखल असलेल्या मित्राला भेटून तो कारने परत नेरुळकडे येत असताना मोटरसायकलवर आलेल्या दोघांनी त्याची कार अडवली. त्यानंतर कट का मारला असा जाब विचारत त्याला लुटण्याचा प्रयत्न केला. यामध्ये त्याच्या गळ्यातली चैन खेचल्यानंतर त्याच्या गाडीची चावी मिळवून ती देखील पळवण्याच्या प्रयत्नात होते. मात्र रिचर्डसन याने गाडीची चावी झाडीत फेकून दिल्याने त्यांनी तिथून पळ काढला होता.
याप्रकरणी तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्या तपासासाठी वरिष्ठ निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राजेंद्र घेवडेकर, भालेराव सोमनाथ, रोहित राठोड, किरण घुगे, सुनील सकट, चेतन पाटील, राजेश उघाडे व मनोहर जाधव यांचे पथक करण्यात आले होते. त्यांनी फिर्यादीने केलेल्या गुन्हेगारांच्या वर्णनावरून परिसरातले सीसीटीव्ही तपासले. त्यामध्ये संशयित लुटारू व त्यांच्या दुचाकीची माहिती समोर आली होती. त्याद्वारे कोपर खैरणे परिसरात पोलिसांनी पाळत ठेवून दोघांना अटक केली आहे.
आकाश पोळ (२३) व सिद्धांत बरदाडे (२३) अशी त्यांची नावे असून ते सेक्टर १७ व १८ मध्ये राहणारे आहेत. त्यांच्याकडून रिचर्डसन याची चोरलेली ७० हजार रुपये किमतीची चैन व गुन्ह्यासाठी वापरलेली मोटरसायकल हस्तगत करण्यात आली आहे. त्यांनी अशाच प्रकारे इतरही गुन्हे केल्याची शक्यता असून पोलिस अधिक तपास करत आहेत.