शिक्षण थांबवल्याने अल्पवयीन बहिणींनी सोडले घर; गुडगाव मधून पाच मुलींना घेतले ताब्यात
By सूर्यकांत वाघमारे | Published: February 12, 2024 04:38 PM2024-02-12T16:38:07+5:302024-02-12T16:38:32+5:30
गुन्हे शाखेची कामगिरी
नवी मुंबई : शिक्षणाची आवड असूनही घरचे शिकू देत नसल्याने तीन अल्पवयीन मुलींनी घर सोडल्याची घटना समोर आली आहे. तर शेजारच्याच दोन मुलींना शिक्षण आवडत नसल्याने त्यांनीही या मुलींसोबत थेट गुडगाव गाठले होते. या पाचही मुलींना पोलिसांनी गुडगाव येथून सुखरूप ताब्यात घेतले आहे.
तळोजातून एकाच वेळी पाच अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची नोंद झाल्याने पोलिसांनी गांभीर्याने घेतले होते. त्यामुळे अपहरणाचा गुन्हा दाखल होताच गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे, सहायक निरीक्षक नीलम पवार, उपनिरीक्षक शरद भरगुडे, विजय चौधरी, महेंद्र ठाकूर आदींच्या पथकाने सीसीटीव्हीच्या आधारे मुलींचा शोध घेण्यास सुरवात केली. त्यामध्ये तळोजा येथून त्या खारघर व तिथून बांद्रा ला गेल्याचे दिसून आले. त्यामुळे बांद्रा येथून राज्याबाहेर जाणाऱ्या रेल्वे प्रवास्यांच्या यादी पडताळणीत त्या गुडगावला गेल्याचे समोर आले. त्यांना कोणी फूस लावून नेली असल्यास घातपाताची शक्यता नाकारता येत नव्हती. यामुळे गुन्हे शाखेचे पथक तातडीने गुडगाव येथे पोहचले असता पाचही मुली त्याठिकाणी आढळून आल्या. एका मुलीच्या भावाने त्यांना राहण्यासाठी भाड्याने घर घेऊन दिले होते.
तमन्ना (१४) हिला सात बहिणी असल्याने घरच्यांनी त्यांचे शिक्षण थांबवले होते. परंतु त्यांना शिक्षणाची आवड असल्याने एक महिन्यापासून तमन्नाने सात व पाच वर्षाच्या बहिणीसोबत पळून जायची तयारी चालवली होती. त्यातच शेजारी राहणाऱ्या प्रिया (१६) व संतोषी (१४) यांना शिक्षणाची आवड नसल्याने व घरचे वातावरण चांगले नसल्याने त्या देखील त्यांच्यासोबत पळून जायला तयार झाल्या होत्या. त्यानुसार ३ फेब्रुवारीला पाचही मुलींनी घर सोडून थेट गुडगाव गाठले होते. त्याठिकाणावरून त्यांना ताब्यात घेऊन महिला व बालकल्याण समितीच्या ताब्यात देण्यात आले आहे.