नवी मुंबईत दोन ठिकाणी भूमिगत कचराकुंड्या; प्रायोगिक तत्त्वावर उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2020 11:27 PM2020-10-11T23:27:31+5:302020-10-11T23:27:41+5:30
ओला-सुका कचऱ्यासाठी स्वतंत्र कप्पे
नवी मुंबई : महानगरपालिकेने करावेमध्ये दोन ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर ‘भूमिगत कचराकुंडी’ची संकल्पना राबविली आहे. ओला व सुका कचरा टाकण्यासाठी स्वतंत्र सुविधा करण्यात आली आहे.
‘स्वच्छ सर्वेक्षण २०२१’मध्ये देशात प्रथम क्रमांक मिळविण्याचे उद्दिष्ट महानगरपालिकेने निश्चित केले असून, अभियानाला सुरुवात केली आहे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी विविध संकल्पना राबविण्यात येत असून त्याचाच भाग म्हणून भूमिगत कचराकुंड्या उभारण्यात येणार आहेत. खासगी कंपनीच्या सीएसआर निधीमधून पामबीच मार्गालगत श्रीबामणदेव भुयारी मार्गाजवळ व श्रीगणेश तलावानजीक दोन कचºयाकुंड्या तयार केल्या आहेत. पायाने पायडल दाबल्यानंतर या कुंडीचे झाकण उघडते व कचरा टाकल्यानंतर बंद होते. यामुळे कचरा नजरेसमोर न राहता तो भूमिगत कुंडीत पडतो व दुर्गंधीही पसरत नाही. ओल्या व सुक्या कचºयासाठी १.१ क्युबिक मीटरच्या स्वतंत्र कचराकुंड्या आहेत. हायड्रोलिक सिस्टीमद्वारे कचराकुंड्या वर आणून त्यामधील कचरा कॉम्पॅक्टरमधून वाहून नेला जाणार आहे.
करावेमध्ये या कचराकुंड्यांचे शुक्रवारी लोकार्पण करण्यात आले. या वेळी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, बाबासाहेब राजळे, चंद्रकांत तायडे, माजी नगरसेवक विनोद म्हात्रे, आकाश खत्री, अभय कामठणकर, भावेश सेजपाल, अखिल पाल्हेकर आदी उपस्थित होते.