सायन-पनवेल महामार्गावर भुयारी मार्गांची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 01:55 AM2019-06-14T01:55:15+5:302019-06-14T01:55:38+5:30
वापर करण्यास नागरिकांची पाठ : मार्गात कचरा आणि सांडपाणी
नवी मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभागाने सायन-पनवेल महामार्गावर अपूर्ण काम केलेल्या चार भुयारी मार्गांची पालिकेने लाखो रु पये खर्च करून डागडुजी केली आहे; परंतु देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने भुयारी मार्गांत सांडपाणी, कचरा साचला असून भुयारी मार्गाचा वापर करणे नागरिक टाळत आहेत.
सायन-पनवेल महामार्गावर वाहनांची प्रचंड वर्दळ आहे. महामार्ग ओलांडणाऱ्या नागरिकांचे अपघात टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने महामार्गावर नेरु ळ एलपी येथे दोन, नेरु ळ एसबीआय कॉलनी आणि उरण फाटा या ठिकाणी प्रत्येकी एक भुयारी मार्ग बनविण्याचे काम हाती घेतले होते; परंतु ते काम पूर्ण केले नव्हते. अनेक वर्षांपासून ते अर्धवट अवस्थेत असलेल्या भुयारी मार्गात सांडपाणी आणि कचरा साचला होता, त्यामुळे या परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले होते. स्वच्छ सर्वेक्षण २०१८ या मोहिमेमध्ये महापालिकेच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागाने अर्धवट बांधलेल्या या चारही भुयारी मार्गांची दुरु स्ती करून नागरिकांसाठी खुले केले होते. या कामासाठी महापालिकेने तब्ब्ल ४३ लाख रु पयांचा निधी खर्च केला आहे. नेरु ळ एलपी येथील दोन भुयारी मार्गांना गर्दुल्ल्यांनी अड्डा बनविला होता, या भुयारी मार्गात मद्यपान आणि जुगार खेळला जात असल्याने नागरिक वापर करीत नसल्याने एलपी येथील दोन्ही भुयारी मार्ग वापरासाठी बंद केले आहेत. एसबीआय कॉलनी आणि उरण फाटा या ठिकाणच्या भुयारी मार्गातही मोठ्या प्रमाणावर कचरा आणि मद्याच्या रिकाम्या बाटल्यांचा खच पडला आहे. या महापालिकेच्या माध्यमातून डागडुजी केलेल्या भुयारी मार्गात साचलेल्या सांडपाण्यामुळे दुर्गंधी सुटली असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेने या भुयारी मार्गांची स्वच्छता करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.