खारघरमध्ये अघोषित पाणीबाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 11:13 PM2019-06-18T23:13:22+5:302019-06-18T23:13:39+5:30
जलवाहिनीत बिघाड; नागरिकांमधून संताप
पनवेल : सिडकोच्या मालकीच्या हेटवणे धरणातून पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीत बिघाड झाल्याने खारघर शहरातील पाणीपुरवठा रविवारपासून खंडित झाला आहे. तीन दिवस उलटूनही पाणीपुरवठा सुरळीत झाला नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
खारघरसह उलवे, द्रोणागिरी नोडमध्ये हेटवणे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. एकीकडे मुलांच्या शाळा सुरू झाल्याने शाळेच्या पहिल्या दिवसाची लगबग सुरू असताना अघोषित पाणीबाणी निर्माण झाल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. एकीकडे शहरात पाणी समस्या उद्भवली असताना टँकरमाफिया जोरात आहेत. त्यामुळे नागरिकांना चढ्या दराने पाणी विकत घ्यावे लागत आहे. यासंदर्भात प्रभाग अ चे सभापती शत्रुघ्न काकडे यांना माहिती मिळताच त्यांनी काम सुरू असलेल्या जलवाहिनीच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी हेटवणे धरण पाणीपुरवठा विभागाचे अभियंता राजेश हातवार हे देखील उपस्थित होते. मंगळवारी रात्रीपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे सुरू होईल, अशी माहिती त्यांनी दिली. सध्याच्या घडीला जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही. शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे.