कमलाकर कांबळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी मातोश्रीवर जावून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. छोटा रिचार्ज येवून गेल्याचे समजते, अशा शब्दात असदुद्दीन ओवेसी यांनी या भेटीवर मिश्कील टिप्पणी केली. मोदी आणि शहा यांच्या हातातील तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रिमोट कंट्रोल मोदी-शहा यांच्या हातात असल्याची टीकाही त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना केली.
एआयएमआयएमचे पहिलेच राष्ट्रीय अधिवेशन मुंबईत होत आहे. याचीच माहिती देण्यासाठी नवी मुंबईतील महापे येथे शनिवारी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्यासह सोळा राज्यातील पक्षाचे खासदार, आमदार आणि पक्षांचे अध्यक्ष उपस्थित होते.
केंद्र सरकार मुस्लिमांच्या विरोधात आहे. हरियाणा आणि राजस्थानमध्ये अल्पसंख्यांकावर अन्याय होत आहेत. पिडितांना न्याय मिळवून देण्याऐवजी कॉंग्रेस भारत जोडो यात्रेत मग्न आहे. लव्ह जिहादच्या मोर्चामागे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असल्याची टिका ओवेसी यांनी केली. लोकभावना विचारात न घेता औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांचे अनुक्रमे छत्रपती संभाजी नगर आणि धाराशिव, असे नामकारण करण्यात आले आहे. त्याचा ओवेसी यांनी यांनी यावेळी निषेध केला. लोकसभा निवडणुकीत आम्ही औरंगाबाद जिंकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तसेच लोकसभा निवडणुकीसाठी कोणाशी आणि कशी आघडी करायची याबाबत या अधिवेशनात चर्चा होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
औरंगाबाद शहराच्या नामकारणाला आमचा विरोध आहे. त्यासाठी आम्ही मोर्चाही काढला होता. मात्र त्यानंतरही नामकारण करण्यात आले. आता नामकारण झालेच आहे, तर सरकारने या शहरातील जीवनमान सुधारण्यावर भर द्यावा, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवाव्यात, पाण्याचा प्रश्न मार्गी लावाला. केवळ नाव बदलून हे शक्य होणार नाही, याची सरकारलाही जाण आहे. एकूणच जनतेच्या भावनेशी हा खेळ असून त्याविरोधात आमची कायदेशीर लढाई सुरूच राहिल, असे इम्तियाज जलील यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.