हाहाकारानंतर पनवेलमध्ये परिस्थिती पूर्ववत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 02:15 AM2019-07-29T02:15:27+5:302019-07-29T02:15:46+5:30
रविवारी पावसाचा जोर कमी : पुरामुळे गावांत साचला कचरा; आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती
वैभव गायकर
पनवेल : तीन दिवसांपासून पनवेल परिसरात पावसाने धुमाकूळ घातल्याने अनेक गावांत पूरस्थिती निर्माण झाली होती. रविवारी पावसाचा जोर कमी झाल्याने परिस्थिती पूर्वपदावर आली. पनवेल तालुक्यात गेल्या दोन दिवसांत ५१० मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद करण्यात आली. गाढी नदीचे पाणी परिसरात लोकवस्तीत शिरल्याने येथील रहिवाशांना पनवेलमधील जामा मशिदीत तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतर करण्यात आले होते.
पनवेल शहरात भारतनगर झोपडपट्टी, कोळीवाडा, कच्छी मोहल्ला, पटेल मोहल्ला, टपाल नाका, भुसार मोहल्ला, कुंभारवाडा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी शिरले होते. रविवारी सकाळी पावसाने उसंत घेतल्याने पाण्याचा निचरा झाला. पूरस्थितीमुळे शहरात कोठेही जीवितहानी झाली नसली, तरी लोकांच्या घरात पाणी शिरल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले. शहरातील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी आमदार बाळाराम पाटील व पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी पटेल मोहल्ल्यामधील रहिवाशांची भेट घेतली. २६ जुलै, २००५ नंतर तब्बल १४ वर्षांनंतर शहरात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती.
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळासाठी मोठ्या प्रमाणात भराव करण्यात आले आहे. भरावामुळे पाण्याचा निचरा होण्यास वेळ लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अतिवृष्टीमुळे पाण्याचा निचरा होण्यास विलंब लागल्याने, किनारी भागातील रहिवाशांना शहरात आश्रय घ्यावा लागला. पुराचे पाणी ओसरल्यानंतर मात्र नदीपात्रातून आलेला कचऱ्याचा खच नदीकाठच्या परिसरात पाहावयास मिळाला. पनवेल शहरालगतच्या आदिवासी वाडीतही मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी शिरल्याने,े येथील अंकुश लक्ष्मण नाईक या ग्रामस्थाचे घर कोसळले, तर अनेकांच्या घरात पाणी गेल्याने मोठे नुकसान झाले.
पनवेल महापालिकेच्या माध्यमातून आदिवासी वाडीतील रहिवाशांचे तालुका क्रीडा संकुलात स्थलांतर करण्यात आले. या ठिकाणी रहिवाशांच्या जेवणाची व्यवस्थादेखील करण्यात आली.
शहरातील सर्व तलाव भरले आहेत. मात्र, पावसाचा जोर वाढल्यास पाणी लोकवस्तीत घुसण्याची शक्यता असल्याने महापालिकेने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी, सर्व विभागांतील अधिकाऱ्यांना आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. पूरस्थितीमुळे ज्या ठिकाणी आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, त्या ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम राबवून धुरीकरण व औषध फवारणी करण्याचे आदेश स्वच्छता निरीक्षकांना देण्यात आले आहेत.
विमानतळ गाभा क्षेत्राबाहेर पूरसदृश्य स्थिती
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ गाभा क्षेत्राबाहेरदेखील मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला. पारगाव, ओवळे, भंगारापाडा, दापोली आदी गावांत पाणी शिरले. पारगाव-रुद्रनगरमधील २५ ते ३० घरे पाण्याखाली गेली. सिडको, तसेच महसूल प्रशासनाचे या ठिकाणी पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचा आरोप माजी सरपंच महेंद्र पाटील यांनी केला आहे. या ठिकाणच्या रहिवाशांना शासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी पाटील यांनी केली.