दुर्दैवी घटना...; मुलाच्या लगीनघाईतच वडिलांचा अपघाती मृत्यू
By सूर्यकांत वाघमारे | Published: October 6, 2023 07:25 PM2023-10-06T19:25:10+5:302023-10-06T19:25:58+5:30
सीवूड मॉल लगतच्या पुलावर शुक्रवारी पहाटे हा अपघात घडला.
नवी मुंबई : मुलाच्या लग्नाची घाई असतानाच लग्नापूर्वी नातेवाईकांकडे जेवण करून घरी जात असताना वडिलांचा अपघाती मृत्यूची झाल्याची घटना घडली. यामुळे लगीनघाईत असलेल्या कुटुंबावर एक दिवस अगोदरच दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सीवूड मॉल लगतच्या पुलावर शुक्रवारी पहाटे हा अपघात घडला.
सीवूड येथे राहणाऱ्या इब्राहिम बोहरा याचे शनिवारी लग्न होणार होते. त्यानुसार त्यांच्या प्रथेप्रमाणे २ ऑक्टोबरला मध्यप्रदेशमध्ये मुलीच्या घरी एक कार्यक्रम उरकून गुरुवारीच सर्वजण परत नवी मुंबईला आले होते. त्यानंतर गुरुवारी रात्री इब्राहिम यांच्या सानपाडा येथील चुलत्यांकडे सर्वजण जेवणासाठी गेले होते. त्याठिकाणी सहकुटुंब जेवण केल्यानंतर त्यांचे वडील ताहीर बोहरा (५३) व लग्नासाठी गुजरातवरून आलेला मित्र मुस्तफा कपासे (२६) दोघे मोटारसायकलवरून सीवूडकडे चालले होते. मध्यरात्री १२.१५ च्या सुमारास त्यांची मोटरसायकल सीवूड स्थानकालगतच्या पुलावर आली असता पाठीमागून आलेल्या वाहनाने त्यांना धडक दिली. यामध्ये दोघेही रस्त्यावर पडले असता ताहीर यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
यामुळे मुलाच्या लग्नाच्या एक दिवस अगोदरच वडिलांना मृत्यूने गाठल्याची हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी शुक्रवारी सकाळी नेरुळ पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.