लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : दुचाकीस्वारांचे अपघात टाळण्यासाठी तसेच अपघातानंतर प्राण जाऊ नयेत यासाठी हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. यासाठी नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी शासकीय आणि खासगी कार्यालये, महाविद्यालये आदी ठिकाणी ‘नो हेल्मेट नो एंट्री’ उपक्रम राबविला होता. परंतु आता या उपक्रमाचा कार्यालयांना विसर पडला असून उपक्रम सुरू केलेल्या ठिकाणी दुचाकीस्वारांची विनाहेल्मेट घुसखोरी सुरू आहे. सदर उपक्रम वाहतूक पोलिसांनी पुन्हा राबवावा, अशी मागणी केली जात आहे.नवी मुंबई महापालिका मुख्यालय हे पामबीच मार्गाशेजारी असून मुख्यालयात विविध कामांसाठी दुचाकीने येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. येथे येणाऱ्यांना पामबीच मार्गाचा वापर करावा लागतो. पामबीच मार्गावरील अपघाताच्या घटना टाळण्यासाठी महापालिका मुख्यालयातही हा उपक्रम सुरू करण्यात आला होता. या उपक्रमाची दुचाकीस्वारांना माहिती व्हावी यासाठी प्रवेशद्वारावर फलक बसविण्यात आले होते. तसेच हेल्मेटचा वापर न करणाऱ्या दुचाकीस्वारांवर वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून कारवाईदेखील केली जात होती. परंतु आता या मोहिमेकडे दुर्लक्ष केले जात असून कार्यालयांच्या प्रवेशद्वारांवर लावण्यात आलेले फलक काढण्यात आले आहेत. ज्या कार्यालयांमध्ये सदर उपक्रम सुरू करण्यात आला होता त्या कार्यालयांमध्ये अनेक दुचाकीस्वार विनाहेल्मेट घुसखोरी करत आहेत. त्यामुळे दुचाकीस्वारांच्या सुरक्षेचा पुन्हा प्रश्न निर्माण झाला असून सदर उपक्रम वाहतूक पोलिसांनी पुन्हा राबविण्याची मागणी केली जात आहे.
नो हेल्मेट नो एंट्री’ उपक्रम दुचाकीस्वारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा असून येणाऱ्या रस्ता सुरक्षा अभियान काळात या उपक्रमाला पुन्हा पुनर्जीवित करण्यात येईल.- पुरुषोत्तम कराड (उपआयुक्त, वाहतूक पोलीस, नवी मुंबई)