तळोजात कारवाईविरोधात एकवटले प्रकल्पग्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 01:43 AM2019-11-09T01:43:33+5:302019-11-09T01:43:48+5:30
नावडे गावाजवळील मुंब्रा-कळंबोली मार्गालगत असलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी बांधकामावर
पनवेल : नावडे-तळोजा विभागातील प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी बांधकामावर कारवाई करण्यासाठी शुक्रवारी सिडकोचे अतिक्रमण विभागाचे पथक दाखल झाले होते. मात्र, प्रकल्पग्रस्तांचा रोष पाहून पथकाला माघारी फिरावे लागले. कारवाईला विरोध करण्यासाठी प्रकल्पग्रस्त एकत्रित झाल्याने सिडकोने शुक्रवारच्या कारवाईला स्थगिती दिली.
नावडे गावाजवळील मुंब्रा-कळंबोली मार्गालगत असलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी बांधकामावर कारवाईसाठी शुक्रवारी तारीख निश्चित झाली होती. आमदार बाळाराम पाटील यांचे मूळ गाव नावडे या ठिकाणी ही कारवाई असल्याने बाळाराम पाटील यांनी इतर पक्षाच्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
कारवाईला स्थगिती दिल्याचा निरोप वरिष्ठ पोलीस निरीक्षकाकडे दिल्यानंतर पोलिसांनी याबाबत प्रकल्पग्रस्तांना माहिती दिली. त्यानंतर प्रकल्पग्रस्त शांत झाले. या वेळी काँग्रेसनेते महेंद्र घरत, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, काशिनाथ पाटील, शिवसेनेचे बबन पाटील, नगरसेवक हरेश केणी, विष्णू जोशी, ज्ञानेश्वर पाटील आदीसह शेकडो प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.
प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने एकवटल्याने सिडको अधिकाऱ्यांनी थेट तळोजा पोलीस ठाणे गाठले. न्याय हक्कासाठी प्रकल्पग्रस्तांनी सिडको विरोधात लढा देण्याची गरज असल्याचे या वेळी बाळाराम पाटील यांनी स्पष्ट केले. काँग्रेसचे नेते महेंद्र घरत यांनीदेखील प्रकल्पग्रस्तांवर केल्या जाणाºया कारवाईचा विरोध करण्यासाठी एकत्र येऊ, असे स्पष्ट केले.