नवी मुंबई : सिडकोच्या आस्थापनेवर विविध विभागांत काम करणाऱ्या तृतीय श्रेणीतील ६९ कर्मचाऱ्यांच्या तडकाफडकी विभागांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पारदर्शक आणि गतिमान कारभाराचा एक भाग म्हणून या बदल्या केल्याचा दावा व्यवस्थापनाने केला आहे. असे असले तरी या बदली प्रक्रियेत दुजाभाव केल्याचा आरोप करून प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सिडकोच्या माध्यमातून हजारो कोटींच्या विकास प्रकल्पांची कामे सुरू आहेत. विशेषत: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना प्रकल्प, पंतप्रधान आवास योजना, सागरी मार्ग आदींचा यात प्रामुख्याने समावेश आहे. या प्रकल्पांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचा निर्णय सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांनी घेतला आहे. त्यानुसार गतिमान आणि पारदर्शक कारभारासाठी एकाच विभागात अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या तृतीय श्रेणीतील ६९ कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.
बदल्या केलेल्यांत कार्यालयीन सहायक आणि लिपिकांची संख्या सर्वाधिक आहे. त्याप्रमाणे शिफाई, सफाई कर्मचाऱ्यांच्यासुद्धा बदल्या केल्या आहेत. असे असले तरी अचानक केलेल्या या विभागांतर्गत बदल्यांमुळे काही कर्मचाऱ्यांत नाराजीचे सूर आहेत. विशेषत: प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांवर यात अन्याय झाल्याची ओरड केली जात आहे, तर अनेक वर्षांपासून एकाच विभागात काम करीत असलेल्या काही वरिष्ठ कर्मचाऱ्यांना यातून डावलल्याचा आरोप केला जात आहे.दरम्यान, या बदली प्रक्रियेत काही वरिष्ठ कर्मचाऱ्यांवर अन्याय झाल्याच्या तक्रारी आहेत. तसेच व्यवस्थापक (कार्मिक) यांनी बदल्यांसंर्दभात असोसिएशन ला दिलेल्या आश्वासनाची पुर्तता न केल्यामुळे प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आहे. याबाबत उद्या व्यवस्थापनासोबत चर्चा करणार असल्याचे सिडको एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष विनोद पाटील आणि प्रकल्पग्रस्त कर्मचारी वेल्फेअर असोसिएशन चे अध्यक्ष जे.टी. पाटील यांनी म्हटले आहे.