NMMT च्या जखमी वाहकाला युनियनने दिला आर्थिक मदतीचा हात
By योगेश पिंगळे | Published: August 18, 2023 07:26 PM2023-08-18T19:26:09+5:302023-08-18T19:26:35+5:30
नावडे फाटा येथे बसचा टायर फुटून मोठा अपघात झाला होता
योगेश पिंगळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रम (एनएमएमटी) मध्ये ठोक मानधनावर काम करणारे वाहक काशिनाथ त्रिंबक बावस्कर हे ७१ क्रमाकांच्या बसमधे वाहक म्हणून कर्तव्य पार पाडत असताना नावडे फाटा येथे बसचा टायर फुटून मोठा अपघात झाला होता. या अपघातामध्ये बावस्कर हे जखमी झाले होते. आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने बावस्कर यांच्या कुटुंबीयांपुढे विविध समस्या निर्माण झाल्या होत्या. इंटक संलग्न महाराष्ट्र कर्मचारी युनियनने पुढाकार घेत बावस्कर यांना शुक्रवारी आर्थिक मदत केली.
अपघातग्रस्त वाहकाला प्रशासनाकडून उपचारासाठी मदत मिळणे तसेच उपचार कालावधीत त्यांचे वेतन सुरु ठेवणे आवश्यक होते. मात्र या काळातील वेतन देखील देण्यात न आल्याने बावस्कर याना विविध आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागले. शुक्रवारी या जखमी कर्मचाऱ्याची नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी भेट घेतली. यावेळी त्यांना कर्मचारी संघटनेच्या वतीने त्यांना १५ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. यावेळी रविंद्र सावंत यांच्यासमवेत महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे सचिव मंगेश गायकवाड, कंत्राटी कामगार युनिट अध्यक्ष संजय सुतार, परिवहन विभाग युनिट अध्यक्ष नितीन गायकवाड, उपाध्यक्ष कांतीलाल चांदणे, इस्माईल सैयद, गोविंद गायकवाड, नरेश मागडे, बाळु भालेराव, विजू राठोड, जितेश तांडेल, अभिषेक पथया, रतन वैद्य, राजेश शेलारकर आदी उपस्थित होते.