मधुकर ठाकूर
उरण : जेएनपीए गेल्या ३४ वर्षांपासून सागरी उद्योगात कार्यरत असून देशाच्या अर्थव्यवस्थेत बंदराने मोठे योगदान दिले आहे. खलाशांनीही मोठे योगदान देत भारताची अर्थव्यवस्था मजबूत केली आहे. शिपिंग उद्योगाच्या वाढीमुळे भारताचा विकास होण्यास मदत होईल याची त्यांना जाणीव आहे. म्हणूनच आपण या क्षेत्राला सर्वतोपरी मदत केली पाहिजे.
राज्य सरकार तसेच स्थानिक प्राधिकरणांचे सहकार्य ही काळाची गरज आहे. याशिवाय या क्षेत्राला आणि देशाला समृद्ध करण्यास मदत करण्यासाठी देशातील इतर सर्व बंदरांनी पुढे येत बंदरातील सुविधा सुधारण्यासाठी एकत्र काम केले पाहिजे असे आवाहन केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग आणि पर्यटन राज्यमंत्री यांनी रविवारी जेएनपीएच्या सीफेरर्स क्लबचे उद्घाटनप्रसंगी केले.
आंतरराष्ट्रीय नाविक दिनाचे औचित्य साधत केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग आणि पर्यटन राज्यमंत्री यांच्या हस्ते रविवारी (२५) जेएनपीएच्या या सीफेरर्स क्लबचे उद्घाटन करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय सागरी व्यापार, जागतिक अर्थव्यवस्था आणि संपूर्ण समाजात जगभरातील खलाशांनी केलेल्या अपवादात्मक योगदानाची दखल घेत त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून दरवर्षी २५ जून रोजी आंतरराष्ट्रीय नाविक दिन साजरा करण्यात येतो.या दिनानिमित्ताने सीफेरर्स क्लबचे उद्घाटन करण्यात आले.हा अत्याधुनिक क्लब जेएनपीए परिसरात स्थित असून खलाशांसाठी अत्यंत आरामदायक आहे. सागरी व्यावसायिक जमिनीवर कार्यरत असताना हा क्लब त्यांच्यासाठी एक परिपूर्ण जागा ठरणार आहे.
सागरी उद्योगात खलाशांनी केलेल्या अमूल्य योगदानाची ओळख आहे. सीफेरर्स क्लबचे उद्दिष्ट या मेहनती व्यक्तींच्या कल्याणासाठी तसेच त्यांना अनेक प्रकारच्या सुविधा आणि सेवा प्रदान करणे आहे. ज्यामुळे त्यांचे जेएनपीए येथील वास्तव्य अधिक आनंददायी होईल.जेएनपीएला असलेल्या जाणीवा पोटी सीफेरर्स क्लबची निर्मिती करण्यात आली असल्याची माहिती जेएनपीए अध्यक्ष संजय सेठी यांनी दिली.यावेळी राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी मार्गदर्शन करतानाक्षेत्राला आणि देशाला समृद्ध करण्यास मदत करण्यासाठी देशातील इतर सर्व बंदरांनी पुढे येत बंदरातील सुविधा सुधारण्यासाठी एकत्र काम केले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी जेएनपीएचे उपाध्यक्ष उन्मेष वाघ, मुंबई प्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार आशिष शेलार, आमदार महेश बालदी, आणि इतर मान्यवरांसह जेएनपीए विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.