मधुकर ठाकूर
उरण : महाराष्ट्र राज्यातील मच्छीमारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि केंद्र सरकारच्या मच्छीमारांच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांवर चर्चा करण्यासाठी मे (१७) रोजी करंजा भेटीवर आलेल्या केंद्रीय मच्छीमार मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी मच्छीमारांसाठी कोणतीही ठोस योजना जाहीर केली नाही.पहिल्यांदा केंद्रीय मंत्री आल्यानंतरही मच्छीमारांच्या हाती काही एक हाती लागले नसल्याने " खोदा पहाड , निकला चुहॉ" अशी अवस्था येथील मच्छीमार समाजाची झाली आहे.
महाराष्ट्र राज्यातील मच्छीमारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि केंद्र सरकारच्या मच्छीमारांच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांवर चर्चा करण्यासाठी मे (१७) रोजी करंजा भेटीवर पहिल्यांदाच केंद्रीय मच्छीमार मंत्री पुरुषोत्तम रुपाला सपत्नीक आले होते. करंजा येथील रो-रो जेट्टीवर आयोजित करण्यात आलेल्या या सागर परिक्रमाच्या पाचव्या चरणाच्या कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, केंद्रीय मंत्री महोदयांच्या पत्नी श्रीमती रुपाला, केंद्रीय मंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी अभिलाष लेखी, मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव डॉ.अतुल पाटणे, सहसचिव डॉ.जे.बालाजी, पंकज कुमार,भारतीय तटरक्षक दलाचे डीआयजी अनुराग कश्यप, मत्स्यव्यवसाय विभागाचे सहआयुक्त महेश देवरे, सहाय्यक आयुक्त संजय पाटील आदी मान्यवर आणि मच्छीमार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रास्ताविक करतानाच करंजा मच्छीमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष प्रदीप नाखवा यांनी मच्छीमारांचे विविध प्रश्न, भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर ऊहापोह करीत केंद्र व राज्य सरकारने तत्काळ सोडविण्याची मागणी केली. आमदार महेश बालदी यांनीही पारंपरिक आणि अपारंपारिक मच्छीमार यांच्यातील सुरू असलेल्या संघर्षावर टिका टिप्पणी केली. राज्यातील मच्छीमारांच्या समस्या मांडून केंद्रीय मंत्र्याने सोडविण्याची मागणी केली. राज्याचे मत्स्यव्यवसाय आयुक्त अतुल पाटणे यांनीही मच्छीमारांच्या योजना आणि विविध योजनांवर खर्च करण्यात आलेल्या निधीची माहिती दिली.राज्याचे उद्योग व रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनीही भाषणातून पारंपारिक आणि अपारंपारिक मच्छीमारांच्या समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.मच्छीमारांवर यापुढे कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही यासाठी पुढाकार घेतील असा विश्वास रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.
त्यानंतर पहिल्यांदाच सपत्नीक आलेल्या केंद्रीय मंत्री मत्स्यव्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी मत्स्यव्यवसायाला आधुनिक स्वरूप देण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे यापुढे मासळी बाजार हे ठिकाण घाणयुक्त आणि कलकलाटाचे ठिकाण ही ओळख पुसुन त्याजागी मॉलच्या धर्तीवर मासळी बाजार निर्माण करण्यात येणार आहेत.त्यासाठी
मत्स्यव्यवसायाला आधुनिक स्वरूप देण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे यापुढे मासळी बाजार हे ठिकाण गोंगाटाचे ठिकाण ही ओळख पुसुन त्याजागी मॉलच्या धर्तीवर मासळी मार्केट निर्माण करण्याची योजना आहे. त्यासाठी प्रस्तावाची आवश्यकता आहे अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच बर्फा शिवाय मासळी सुरक्षित ठेवण्याचे तंत्रही लवकरच आणण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे ते म्हणाले.
मच्छीमारांचा भ्रमनिरास
केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्याकडून मच्छीमारांना मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र मच्छीमारांच्या समस्या, मागण्या, विविध प्रश्नांसंदर्भात केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांशी चर्चा करून समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करु असे भाषणातून गोलमोल उत्तरे देऊन केंद्रीय मंत्री रुपाला यांनी वेळ मारुन नेली. त्यामुळे खोदा पहाड निकला चुहॉ अशा प्रतिक्रिया मच्छीमारांकडून व्यक्त केल्या जात होत्या.
कार्यक्रमाला दांड्या
कार्यक्रमास सुधीर मुनगंटीवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उपस्थित राहणार असल्याची जोरदार जाहिरात करण्यात आली होती.ठिकठिकाणी पोस्टर्सही लावण्यात आली होती.मात्र या दोघांनीही कार्यक्रमाला दांड्या मारल्या.