बोगस घरवाटप प्रकरणी युनियन वादात

By admin | Published: September 8, 2016 03:20 AM2016-09-08T03:20:43+5:302016-09-08T03:20:43+5:30

माथाडींच्या बोगस घरवाटप प्रकरणी मुख्य सूत्रधाराच्या अटकेनंतर इतर ५९ जणांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. या तक्रारीमध्ये माथाडी युनियनच्या जनसंपर्क अधिकाऱ्याच्या नावाचा देखील

In union talk about bogus homework case | बोगस घरवाटप प्रकरणी युनियन वादात

बोगस घरवाटप प्रकरणी युनियन वादात

Next

सूर्यकांत वाघमारे , नवी मुंबई
माथाडींच्या बोगस घरवाटप प्रकरणी मुख्य सूत्रधाराच्या अटकेनंतर इतर ५९ जणांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. या तक्रारीमध्ये माथाडी युनियनच्या जनसंपर्क अधिकाऱ्याच्या नावाचा देखील उल्लेख आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसह माथाडी कामगारांच्याच फसवणूक प्रकरणी भविष्यात युनियन वादात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
माथाडी कामगारांसाठी असलेली घरे नेत्यांच्या कोट्यातून बिगर माथाडींना देण्याचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक झालेली आहे. याप्रकरणी १०४ जणांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल होताच एपीएमसी पोलिसांनी दिलीप यादव याला अटक केली आहे. तो राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचा कर्मचारी आहे. नेत्यांशी असलेल्या घरगुती संबंधाचा फायदा घेत त्याने अनेकांचा विश्वास संपादित केला होता. त्याच्या अटकेनंतर अधिक ५९ जणांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. त्यामुळे बोगस घरवाटप प्रकरणात अद्यापपर्यंत १६३ जणांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. त्यांनी नोंदवलेल्या तक्रारीत राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे जनसंपर्क अधिकारी पोपटराव देशमुख यांच्या देखील नावाचा उल्लेख आहे. घरांच्या बहाण्याने यादवने अनेकांना कोट्यवधीचा गंडा घातल्यानंतर त्याच्या शोधात अनेक जण युनियन कार्यालयात जात होते. यावेळी देशमुख यांनी त्यांची भेट घेवून तुमचे काम होईल, काळजी करू नका असे आश्वासन दिले होते. शिवाय त्यानंतर फसवणूक झालेल्यांपैकी काहींची नेत्यांसोबत बैठक देखील घडवून आणली होती. याच बैठकीत यादवने घेतलेल्या रकमेची परतफेड करण्याची जबाबदारी संतोष जाधव याच्यावर देण्यात आली होती. मात्र त्यातूनही काहीच निष्पन्न न झाल्यामुळे अखेर पाच महिन्यांनी संबंधितांनी यादव व चव्हाण यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार केलेली आहे.
या प्रकारामुळे माथाडी कामगार युनियन भविष्यात वादात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यादव हा सध्या पोलिसांच्या अटकेत असून देशमुख यांना देखील पोलिसांच्या चौकशीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. देशमुख हे माथाडी नेते नरेंद्र पाटील व शशिकांत शिंदे या दोघांचेही निकटवर्तीय म्हणून परिचित आहेत. यामुळे पोलिसांमार्फत त्यांची चौकशी झाल्यास या घोटाळ्याची महत्त्वपूर्ण माहिती उघड होण्याची शक्यता तक्रारदारांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे बोगस घरवाटप प्रकरणात देशमुख यांच्या नावाच्या उल्लेखामुळे दोन्ही नेत्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, यासंदर्भात देशमुख यांंच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होवू शकला नाही.

Web Title: In union talk about bogus homework case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.