वैभव गायकर / पनवेलनिवडणुकीची तारीख दिवसेंदिवस जवळ येत आहे तसतसा राजकीय पारा चढत आहे. विशेष म्हणजे नामनिर्देशित पत्र सादर करण्याची वेळ एक दिवसावर येऊन ठेपली असली तरी सर्वच राजकीय पक्षांनी आपले पत्ते खोलले नसल्याने ऐनवेळी बंडखोरांची गोची करण्याचा हा सर्वच राजकीय पक्षांचा डाव असल्याचे बोलले जात आहे. मात्र पनवेल महानगरपालिकेच्या पहिल्यावहिल्या निवडणुकीत नगरसेवकपदी विराजमान होण्याचा मान आपल्यालाच मिळायला हवा अशी अनेक कार्यकर्त्यांची इच्छा असल्याने तिकीट वाटपानंतर मोठ्या प्रमाणात नाराजी नाट्य होणार असल्याने बंडखोरांना स्वीकृत पदाचे आमिष दाखवून शांत करण्याचा प्रयत्न राजकीय पक्षामार्फत केला जात आहे.या निवडणुकीत २० प्रभागात ७८ जागांवर ही लढत होणार आहे. निवडणुकीत शेकाप, काँग्रेस, सपा, राष्ट्रवादी या पक्षांची महाआघाडी झाली आहे. या तिन्ही पक्षातील तिकीट वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. शेकाप जास्तीत जास्त जागांसाठी आग्रही असल्याने हा तिढा सुटत नसल्याचे बोलले जाते. भाजपामध्ये इच्छुकांची संख्या मोठी आहे. तिकिटाच्या अपेक्षेने अनेकांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. युतीबाबत चित्र जरी स्पष्ट झालं नसलं तरी सेना स्वबळावर लढणार हे जवळजवळ निश्चित झाले आहे. पालिकेच्या ७८ जागांसाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे. यामध्ये भाजपा ३२५, सेना १७५, महाआघाडी २५० तसेच नव्याने स्थापन झालेल्या तिसऱ्या आघाडीत १०० पेक्षा जास्त असल्याने हा आकडा ८०० च्या वर जाणार आहे. महानगरपालिकेच्या रणसंग्रामात खरी लढत शेकापविरु द्ध भाजपामध्ये असणार आहे. या दोन्ही पक्षांना तिकीट वाटपानंतर होणारी बंडखोरी कोणत्याही परिस्थितीत थांबवायची आहे, त्यादृष्टीने दोन्ही पक्षातून एक नव्हे दोन नव्हे तर पाच ते दहा जणांना स्वीकृत नगरसेवक पदाचे आमिष दाखविण्यात आले आहे. स्वीकृत नगरसेवक पदाचे गणित पाहिलं असता १५ नगरसेवकांमागे १ स्वीकृत नगरसेवक अशा परिस्थितीत ७८ जागांचा हिशोब लावला असता ५ स्वीकृत नगरसेवक महापालिकेत बसणार आहेत. अशा परिस्थितीत अनेकांना स्वीकृत नगरसेवक देणार असे आश्वासन देऊन बंडखोरांना आपल्या भोवती घिरक्या घालण्याचा प्रयोग राजकीय पक्षांनी केला आहे . विशेष म्हणजे ५ जागांसाठी तब्बल १० ते १२ जणांना स्वीकृतच नगरसेवकाचे आमिष दाखविण्यात आले आहे. ज्या कार्यकर्त्याला उमेदवारी द्यायची नाही त्यासाठी ही अनोखी खेळी राजकीय पक्षामार्फत खेळली जात आहे. राजकीय पक्षांच्या या खेळीमध्ये अनेक कार्यकर्ते क्लीन बोल्ड देखील झाले आहेत. मी स्वीकृत नगरसेवक होणार अशी धारणा अनेक कार्यकर्त्यांची झाली असल्याने काहींनी आपल्या बंडाची तलवार म्यान केल्याचे समजते. निवडणुकीनंतर मात्र अनेकांच्या पदरी निराशा पडणार आहे.
बंडखोरांना शांत करण्यासाठी अनोखी खेळी
By admin | Published: April 28, 2017 12:39 AM