प्रकल्पग्रस्त तरुणांचा अनोखा व्हॅलेंटाईन डे
By admin | Published: February 15, 2017 04:57 AM2017-02-15T04:57:32+5:302017-02-15T04:57:32+5:30
शहरभर तरुण-तरुणींकडून ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा होत असतानाच प्रकल्पग्रस्त तरुणांनी अनोख्या पद्धतीने हा दिवस साजरा केला.
नवी मुंबई : शहरभर तरुण-तरुणींकडून ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा होत असतानाच प्रकल्पग्रस्त तरुणांनी अनोख्या पद्धतीने हा दिवस साजरा केला. युथ फोरमच्या माध्यमातून त्यांनी मित्र-मैत्रिणींना फूल देऊन प्रकल्पग्रस्तांच्या योगदानाप्रती सर्वांनी प्रेम व्यक्त करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
मंगळवारी ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने शहरात सर्वच ठिकाणी तरुण-तरुणींकडून एकमेकांप्रती असलेले मनातले प्रेम व्यक्त केले जात होते. मात्र, त्यांच्याकडून हे प्रेम व्यक्त केले जात असतानाच शहरातील काही प्रकल्पग्रस्त तरुणांनी अनोख्या पद्धतीने त्यांचा ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा केला. याकरिता नवी मुंबई युथ फोरमच्या माध्यमातून काही तरुणांनी वाशीतील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाला भेट दिली. या वेळी त्या ठिकाणी उपस्थित तरुण-तरुणींना त्यांच्यातर्फे पुष्पगुच्छ भेट देण्यात आले. तसेच शहराच्या विकासासाठी स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी दिलेल्या योगदानाची जाणीव सर्वांना असायला हवी. सध्या प्रकल्पग्रस्तांचे अस्तित्व धोक्यात आहे. प्रकल्पग्रस्तांना साथ देण्याचे आवाहन युथ फोरमच्या माध्यमातून तरुणांना करण्यात आले.