नवी मुंबई : महापालिकेच्या शाळेत ठोक मानधनावर काम करणाऱ्या शिक्षिकेचे चार महिन्यांचे वेतन शिक्षण मंडळाने दोन वर्षांपासून थकविले आहे. हक्काचे १८ हजार रूपये मिळविण्यासाठी शिक्षिका वारंवार शिक्षण मंडळाच्या कार्यालयामध्ये फेऱ्या मारत असून त्याची दखल घेतली जात नाही. जाणीवपूर्वक होत असलेल्या अन्यायाविषयी शिक्षकवर्गामध्ये असंतोष निर्माण झाला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शिक्षण मंडळाने ठोक मानधनावर शिक्षकांची नोंदणी केली आहे. सुजाता पावडे या २०१२ मध्ये तुर्भेमधील शाळा क्रमांक २१ मध्ये रूजू झाल्या होत्या. त्यांना डिसेंबर २०१२, जानेवारी, मे व जुलै २०१३ या चार महिन्यांचे वेतन दिलेले नाही. जवळपास १८ हजार ४२५ रूपये वेतन दोन वर्षांपासून दिले जात नाही. वेतन मिळावे यासाठी पावडे यांनी अनेक पत्रे शिक्षण मंडळाला दिली आहेत. शिक्षण अधिकाऱ्यांचीही भेट घेतली आहे. परंतु त्यांच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही. तांत्रिक अडचणी देवून वेतन रखडले असल्याचे सांगण्यात आले होते. लवकरच वेतन दिले जाईल असे दोन वर्षांपासून सांगितले जात आहे. शिक्षण मंडळातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जाणीवपूर्वक शिक्षिकेचे वेतन रखडविले आहे. सदर शिक्षिकेने पालिकेची नोकरी सोडल्यानंतरही त्यांना वेतन दिलेले नाही. किती दिवस अर्ज द्यायचे व अधिकाऱ्यांची भेट घ्यायची असा प्रश्न पावडे यांनी उपस्थित केला आहे. आतापर्यंत केलेल्या पाठपुराव्याची पत्रे महापौर, आयुक्त, आमदार व पालकमंत्र्यांना देवून त्यांच्याकडे न्याय मागितला जाणार असून लवकरात लवकर वेतन न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. (प्रतिनिधी)महिला आयोगाकडे तक्रारपालिकेच्या शाळेमध्ये चार महिने केलेल्या कामाचे वेतन जाणीवपूर्वक रखडविण्यात आले आहे. वारंवार पाठपुरावा करून व पत्र देवूनही त्याची दखल घेतली जात नसल्यामुळे त्रस्त शिक्षिकेने राज्य मानवी हक्क आयोग व महिला आयोगाकडे तक्रार करण्याचा इशारा दिला आहे.
पालिकेने थकविले शिक्षिकेचे मानधन
By admin | Published: November 18, 2015 1:20 AM