नवी मुंबई : शहरात बेकायदा होर्डिंगबाजीचे प्रमाण वाढत चालले आहे. प्रत्येक नोडमध्ये चौकाचौकात विनापरवाना होर्डिंग पहायला मिळत आहेत. यामुळे शहराचे विद्रूपीकरण होत असतानाही मोठ्या होर्डिंगबाजांवर कारवाईकडे अधिकारी कानाडोळा करत असल्याचे दिसत आहे.होर्डिंगच्या माध्यमातून शहराचे होणारे विद्रूपीकरण थांबवण्यासाठी पालिकेकडून ठोस भूमिका घेण्यात आलेली आहे. त्यानंतरही होर्डिंगबाजांवर ठोस कारवाई करण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे. वर्षभरापूर्वी तत्कालीन पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या ठोस भूमिकेमुळे फुकट्या होर्डिंगबाजांवर आवर आला होता. मात्र त्यांच्या बदलीनंतर पुन्हा शहरातील अनधिकृत जाहिरातबाजीचे प्रमाण वाढले आहे. त्यात राजकीय तसेच इतर स्वरूपाच्या होर्डिंगचा समावेश आहे. गल्लीबोळातल्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सुध्दा शहरभर होर्डिंग लावले जात आहेत. यामुळे प्रत्येक विभागातील चौक अनधिकृत होर्डिंगच्या मागे दडपले जात आहेत. अनेकदा दोन, चार होर्डिंगची परवानगी घेवून, प्रत्यक्षात मात्र १५ ते २० होर्डिंग लावले जातात. अशा होर्डिंगबाजांवर कारवाई करून गुन्हे दाखल होणे अपेक्षित असतानाही तसे होताना दिसत नाही. त्याऐवजी छोट्या पत्रकबाजांवर गुन्हे दाखल करून स्वत:ची पाठ थोपटून घेण्याचे काम अधिकारी करत आहेत.>राजकीय शुभेच्छांचे सर्वाधिक फलकमोठमोठे होर्डिंग लावून जाहिरातबाजी करणाऱ्यांमध्ये राजकीय व्यक्ती आघाडीवर असतात. अशावेळी हितसंबंध जोपासत त्यांना कारवाईत अभय दिले जात असल्याचे पहायला मिळत आहे. मागील दोन दिवसांपासून शहरातील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात होर्डिंग पहायला मिळत आहेत.मराठी नववर्षाच्या शुभेच्छांसह राजकीय स्वरूपाचे होर्डिंग दिसत आहेत. त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची मागणी होत आहे.
बेकायदा होर्डिंगबाजीला अभय, प्रशासनाचे होतेय अर्थपूर्ण दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 2:45 AM