बेकायदेशीर आॅनलाइन लॉटरीचे रॅकेट उघडकीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 01:41 AM2019-01-04T01:41:55+5:302019-01-04T01:42:16+5:30
राज्यातील ९ जिल्ह्यांमध्ये सरकारी लॉटरीच्या आडून बेकायदेशीरपणे आॅनलाईन लॉटरी चालविणारे रॅकेट उघडकीस आले आहे.
नवी मुंबई : राज्यातील ९ जिल्ह्यांमध्ये सरकारी लॉटरीच्या आडून बेकायदेशीरपणे आॅनलाईन लॉटरी चालविणारे रॅकेट उघडकीस आले आहे. या प्रकरणी नवी मुंबई गुन्हे शाखेने विविध शहरांमधून ८ आरोपींना अटक केली असून संगणक, लॅपटॉपसह साहित्य जप्त केले आहे. या घोटाळ्यात सहभागी असलेल्या राज्यभरातील एजंटचीही पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे.
अटक केलेल्या आरोपींमध्ये मुख्य सुत्रधार उस्मान गणी हुसेन टिंडीक्कल याच्यासह अनिल पवार (ठाणे), अब्दुलकुदूस मोहम्मद याकुब शेख ( नवी मुंबई ), संदीप खुट े(नाशिक), रविंद्र घुगे(नाशिक), समिर आळंदकर(लातूर) व सचिन आचरेकर (रत्नागिरी) यांचा समावेश आहे. यामधील उस्मानने एका बोगस कंपनीकडून २ लाख रूपयांना साई लकी कूपन नावाने बोगस स्वॉफ्टवेअर करून घेतले. राज्यातील विविध शहरांमधील सरकारच्या गोल्डल, शुभलक्ष्मी व राजश्री या आॅनलाईन लॉटरी चालविणाऱ्या एजंटला भेटून त्यांना सरकारी लॉटरीपेक्षा दुप्पट पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखविले व त्यांना साई लकी कूपन आॅनलाईन लॉटरीसाठी लागणारी लिंक दिली. राज्यातील नाशिक, कोल्हापूर, रत्नागिरी, कराड, सातारा, औरंगाबाद, परभणी, लातूर, सिंधुदुर्ग सोलापूर, सांगली या जिल्ह्यांमध्ये एजंटचे जाळे पसरले होते.
याविषयी माहिती नवी मुंबई गुन्हे शाखेला मिळताच पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांच्या पथकाने कोपरखैरणेमधील लॉटरीकेंद्रावर धाड टाकून पवारला अटक केली. तपासादरम्यान राज्यभर हे रॅकेट पसरले असल्याचे निदर्शनास आले. गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पाच पथके तयार केली व राज्यभरातील आरोपींचे अटकसत्र सुरू केले. अटक केलेल्या ८ आरोपींकडू ५ संगणक, ६ लॅपटॉप, ३७ हार्डडिस्क, प्रिंटर व इतर साहित्य जप्त केले.
८ जणांवर गुन्हा दाखल
मुख्य आरोपी उस्मान टिंडीक्क्ल हा केरळ राज्यातील रहिवासी आहे. त्यानेच साई लकी कूपन नावाने सॉफ्टवेअर तयार करून सरकारमान्य लॉटरी सेंटरमध्ये एजंटच्या मदतीने लॉटरीचा व्यवसाय सुरू केला होता. या प्रकरणी महाराष्ट्र लॉटरी कायदा व महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियमासह माहिती तंत्रज्ञान अधिनियमाअंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. या रॅकेटमध्ये राज्यातील अनेक एजंटचा समावेश असल्याचा संशय असून गुन्हे शाखा पुढील तपास करत आहे.