नवी मुंबई : मूल होत नसल्याने पतीने पत्नीवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार वाशीत उघडकीस आला आहे. त्याशिवाय स्त्रीत्वावर संशय घेवून इतरही प्रकारातून आपला छळ झाल्याचे विवाहितेचे म्हणणे आहे. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात सासरच्या व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वाशीत माहेर असलेल्या २६ वर्षीय विवाहितेसोबत हा प्रकार घडला आहे. लग्नानंतर त्या पतीसोबत चंद्रपूर येथील सासरी स्थायिक झाल्या होत्या. परंतु लग्नानंतर काही दिवसातच पतीकडून त्यांच्या स्त्रीत्वावर संशय घेतला जावू लागला. मूल होत नसल्याने तू स्त्री नाही असे आरोप करत पतीकडून त्यांच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले जात होते. त्याशिवाय सतत शिवीगाळ करत मारहाण देखील व्हायची. वाशीत माहेरी आल्यानंतर देखील सासरच्यांकडून छळ सुरू होता. अखेर सासरच्यांनी त्यांना घटस्फोट देण्याची धमकी देवून घराबाहेर काढले.यावेळी पीडित महिलेने लग्नावेळी दिलेल्या २० तोळे दागिन्यांची मागणी केली असता, ते परत देण्यासही सासरच्यांनी नकार दिला. यामुळे माहेरी आल्यानंतर पीडित महिलेने सासरच्यांविरोधात वाशी पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यानुसार पती अमित जगताप, सासू मीनाक्षी व सासरे नाना जगताप यांच्यासह नणंद अश्विनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वाशी पोलीस अधिकतपास करत आहेत.
पत्नीवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2018 12:08 AM