अनोखी फेरीवालामुक्ती : हातगाडीला टेम्पोचा पर्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 06:29 AM2017-08-11T06:29:59+5:302017-08-11T06:29:59+5:30
पनवेल महानगरपालिकेने रस्त्यावर बसणाºया फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे सिडको वसाहती जवळपास फेरीवालामुक्त झाल्या आहेत. मात्र पोटाची खळगी भरण्याकरिता अनेकांनी हातगाडीऐवजी लहान टेम्पोत आपला व्यवसाय थाटला आहे.
अरु णकुमार मेहत्रे
कळंबोली : पनवेल महानगरपालिकेने रस्त्यावर बसणाºया फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे सिडको वसाहती जवळपास फेरीवालामुक्त झाल्या आहेत. मात्र पोटाची खळगी भरण्याकरिता अनेकांनी हातगाडीऐवजी लहान टेम्पोत आपला व्यवसाय थाटला आहे. चहाची व पानाची टपरी गायब होवून त्याऐवजी फिरते टी सेंटर आणि सायकलवर पानाचा ठेला आहे. कधीही पथक आले तरी त्वरित पळ काढता येईल याकरिता ही शक्कल लढविण्यात आली आहे.
सिडको वसाहतीतील रस्त्याला फेरीवाल्यांनी फेरा घातला होता. पदपथ सुध्दा गिळंकृत केले होते एकंदरीतच फळ, भाजी, चिकन विक्रे त्यांनी आपले बस्तान बांधले होते. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असे, तसेच स्वच्छतेचा बोजवारा उडत होता. सिडकोने मार्केट विकसित न केल्यामुळे रस्त्यावर रोज बाजार भरत असे. परंतु इतक्या वर्षात सिडकोला संबंधितांवर कारवाई करता आलेली नाही. मात्र महापालिका स्थापन झाल्यानंतर आयुक्त सुधाकर शिंदे यांनी मोहीम हाती घेवून रस्ते मोकळे केले. गेल्या चार महिन्यापासून सातत्य असल्याने फेरीवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. अतिक्र मणविरोधी पथक येवून अतिक्र मण शुल्क आकारीत आहेत. त्यामुळे आता हातगाड्या रस्त्यावर दृष्टिक्षेपास पडत नाही. महापालिकेच्या हे धोरण कायदेशीर असले तरी राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार अद्यापही फेरीवाल्यांचे पुनर्वसन झालेले नाही. सिडकोकडून या कायद्यानुसार संबंधितांना जागा देणे बंधनकारक असताना त्याबाबत अंमलबजाणी झालेली नाही. यामुळे हजारो फेरीवाल्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या कारवाईपासून वाचण्याकरिता काही विक्रे त्यांनी मधला मार्ग काढला आहे. कित्येकांनी जुने लहान टेम्पो खरेदी केले आहेत. त्यामध्ये आपले व्यवसाय थाटले असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सेकंड हॅण्ड टेम्पोची मागणी वाढत चालली आहे.
खारघरमधील एका टायरवाल्याने आपले पंक्चरचे दुकान तीनचाकी टेम्पोमध्ये थाटले आहेत. कळंबोली येथील स्मृती गार्डनच्या पदपथावर गॅरेजवाल्यांनी आपले बस्तान बांधले होते. मात्र त्यांच्या मनातही महापालिकेच्या पथकाची भीती असल्याने अनेकांनी तेथून काढता पाय घेतला आहे. मात्र एका फिटरने मारुती कारमध्ये आपले गॅरेज थाटले आहे. मागील डिकीत सर्व साहित्य ठेवण्यात आलेले आहे. वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही अशा ठिकाणी हे फिरते गॅरेज उभे केले जाते. खांदा वसाहतीत शनी मंदिरसमोर गेल्या कित्येक वर्षापासून पान टपरी होती. महापालिकेकडून होणाºया कारवाईच्या भीतीने ही टपरी संबंधिताने काढून टाकली आहे. त्याऐवजी सायकलवर पानाचा ठेला उभारण्यात आला आहे. पान शौकीन या ठिकाणी पान खाण्याकरिता येतात. रोडपाली येथील पोलीस मुख्यालयासमोर पूर्वी चहाची टपरी होती. आजूबाजूचे लोक चहा पिण्याकरिता येथे येत असत. नारायण खराडी या चहावाल्याने जुना टेम्पो खरेदी केला. त्यामध्ये टी सेंटर तयार केले आहे. अनेक जण या नवीन फिरत्या चहाच्या दुकानावर चहा पिण्याकरिता येतात. त्याच्या बाजूला पूर्वी वडापावची हातगाडी होती त्याचाही चांगला धंदा होत असे. मात्र कारवाईपासून वाचण्याकरिता त्या विक्रे त्यानेही टेम्पोत वडापाव सेंटर सुरू केले आहे.